पिंपरी भाजी मंडईतील भाजी विक्रेते मास्क न घालताच....


 पिंपरी भाजी मंडईतील विक्रेते मास्क न घालता नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. 

PRESS MEDIA LIVE : पिंपरी. :

पिंपरी – कोविड -19 महामारीमुळे संपूर्ण जग भयभीत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही पिंपरी भाजी मंडईतील विक्रेत्यांना मात्र मास्कचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. रोज शेकडो ग्राहकांच्या संपर्कात येणारे हे विक्रेते मास्क न घालता नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. 

एकीकडे शहरात रोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचा आकडाही एक हजाराच्या पुढे गेला आहे. अशा भीषण स्थितीतही भाजी विक्रेते मात्र नियमांना पायदळी तुडवत आहेत आणि महापालिका प्रशासनही नेहमीप्रमाणे ढिम्म आहे. भाजीपाला विकत घेणे आवश्‍यकच असल्यामुळे शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने पिंपरी भाजी मंडईत येत असतात. तोंडाला चांगला मास्क व सॅनिटायझरचा काटेकोरपणे वापर करत आहेत. मात्र, विक्रेते दिवसभरात शेकडो लोकांच्या संपर्कात येतात तरीसुद्धा एकाही विक्रेत्याच्या तोंडाला मास्क दिसत नाही. पिंपरी चिंचवड प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतलेली दिसते.

करोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला भाजी मंडईत बेजबाबदारपणे भाजीविक्रेते वागत आहेत. मास्क आपल्यासाठी नसून फक्‍त ग्राहकांनीच वापरण्यासाठी आहे, अशा अविभार्वात ते आपल्या दुकानावर बसलेले दिसतात. मास्क वापरला नाही तर, एक हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा आदेश विभागीय आयुक्त यांनी दिला आहे. मात्र, या आदेशाला पिंपरी मंडईत केराची टोपली दाखवली जात आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका बघ्याच्या भूमिकेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post