हॉटेल व्यवसायांची राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी


हॉटेल व्यावसायिकांची  राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी

PRESS MEDIA LIVE  : पिंपरी : 

पिंपरी - राज्य सरकारने अनलॉक-4 ची नियमावली जाहीर करताना हॉटेल आणि लॉज (राहण्याची सोय) यांना शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पुर्वी 33 टक्के क्षमतेने सुरू असलेले हॉटेल आणि लॉज आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. मात्र, रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्णय न झाल्याने त्याबद्दल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. स्वीट मार्ट आणि हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांचा नागरिक तिथेच थांबूनआस्वाद घेत असताना रेस्टॉरन्टमध्ये बसून खाद्यपदार्थ खाण्यास का मनाई केली जात आहे, असा प्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

           अनलॉक-4 ची नियमावली जाहीर

करताना सरकारने राहण्याची सोय असलेल्या हॉटेल आणि लॉजला 33 टक्के क्षमतेने यापूर्वी परवानगी दिली होती. मात्र, आता सरकारच्या निर्णयामुळे 100 टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. रेस्टॉरंटला सुरू करण्यास परवानगी न मिळाल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

          पाच महिन्यांपासून रेस्टॉरंट बंदच

पिंपरी-चिंचवड, मावळ, राजगुरूनगर या पट्ट्यात सुमारे तीन हजार रेस्टॉरंट आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रेस्टॉरंट आणि बीअर बार बंद आहेत. रेस्टॉरंटमधून घरपोच सेवेला परवानगी आहे. मात्र, रेस्टॉरंटमध्ये बसून खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. रेस्टॉरंटमध्ये बसून अन्नपदार्थ खाण्यास मनाई केली जात असताना टपऱ्या, रस्त्यावरील हातगाड्यांजवळ उभे राहून नागरिक चहापान

आणि खाद्यपदार्थ खाताना दिसतात. त्याशिवाय, स्वीट मार्टमध्ये देखील नागरिक तिथेच थांबून खाद्यपदार्थांचे सेवन करतात. त्याला सरकार कसे परवानगी देते, याविषयी नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

राज्य सरकारने हॉटेल आणि लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, रेस्टॉरंट आणि बिअरबारबाबत निर्णय झालेला नाही. त्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

- पद्मनाभन शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन.

रेस्टॉरंट गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट चालकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनलॉक-4 मध्ये देखील रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. सरकारच्या या निर्णयाबद्दल आम्ही नाराज आहोत.

- गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन.

राहण्याची सोय असलेल्या हॉटेलला 33 टक्के क्षमतेने सुरू करण्यास यापूर्वी परवानगी मिळालेली होती. आता 100 टक्के परवानगी मिळाली आहे. मात्र, रेस्टॉरंटला केवळ पार्सलसाठी परवानगी आहे. स्वीट मार्ट, टपऱ्यांवर नागरिक खाद्यपदार्थ खातात. रेस्टॉरंटमध्ये बसून खाद्यपदार्थ खाण्यास परवानगी दिली जात नसल्याने सरकारच्या निर्णयावर आमची नाराजी आहे.

- उल्हास शेट्टी, प्रमुख हॉटेल व्यावसायिक.

Post a comment

0 Comments