घरोघरी आरोग्य चौकशी केली जाणार

जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या पादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर घरोघरी आरोग्य चौकशी केली जाणार आहे.



PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी आरोग्य चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी पथके नेमण्यात येणार आहेत. रविवारी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात या सर्वेक्षणाला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सामूहिक संसर्गासारखी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. यापूर्वी दररोज शेकडोत रुग्ण आढळत होते. सध्या हजारात रुग्ण आढळून येत आहेत. यासह मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3 टक्क्यांच्या वर गेला जिल्ह्यात वाढत्या संसर्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्‍त करत विविध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

घरोघरी जाऊन आरोग्य चौकशी करा, हे सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा बैठकीत सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सोमवारपासून ही आरोग्य चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येत असून याकरिता पथके नेमण्यात येणार आहेत. त्याबाबत रविवारी होणार्‍या आढावा बैठकीत नियोजन केले जाईल. या पथकाद्वारे प्रत्येक घरात जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे.

घरात कोणाला लक्षणे आहेत का, यापूर्वी घरातील कोणी बाधितांच्या संपर्कात आले आहेत का, याबाबत विचारणा केली जाणार आहे. ज्यांना लक्षणे आढळून येतील, त्यांचे तातडीने स्वॅब घेतले जाणार आहेत. जो बाधित येईल, त्याच्या जवळच्या 15 जणांची तपासणी केली जाणार आहे. कमीत कमी वेळेत बाधितापर्यंत पोहोचून त्यांना विलगीकरण करण्यावर अधिक भर राहील. यामुळे संसर्गाचा वेग कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. याकरिता विविध विभागांचीही मदत घेतली जाणार आहे. यासह परिसरातील तरुण मंडळे, सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था, सामाजिक संस्था, संघटना आदींचीही मदत घेण्याचा विचार आहे.

आज होणार्‍या बैठकीत ग्राम व प्रभाग समित्या अधिक भक्‍कम करण्याबाबतही सूचना केल्या जाणार आहेत. ई-पास रद्द केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक दाखल होत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या या लोकांवर लक्ष ठेवणे, लक्षणे दिसणार्‍यांची तपासणी करणे, बाधित आढळून येणार्‍यांना विलगीकरण कक्षात ठेवणे आदी प्रमुख जबाबदार्‍या या समित्यांनाच पार पाडाव्या लागणार आहेत. याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. यासह सीसीसी व्यवस्थापन, ऑक्सिजनेटेड बेड, आयसीयू आदींबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे..

Post a Comment

Previous Post Next Post