गुन्हेगारी , उमेदवारी आणि निवडणूक अधिकारीगुन्हेगारी,उमेदवारी आणि निवडणूक अधिकारी .

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी.

( ९८ ५०८ ३० २९० / ८४ २११ ३० २९०)          

 PRESS MEDIA LIVE :  

१७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य निवडणुक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी ' निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आणि अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सूचना ' या मथळ्याखाली एक प्रसिद्धीपत्र  वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षते बाबत आणि कार्यवाहीबाबत काही भूमिका स्पष्ट केली आहे. ती निश्चितच स्वागतार्ह व महत्त्वाची आहे. लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नतीसाठी काही नैतिक बाबींचे पालन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

          अलीकडे लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा निवडणूक आणि खर्च यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी काळा पैसा गुन्हेगारी यांचं साटंलोटं दिसत आहे .पूर्वी उमेदवारांना गुन्हेगार सहकार्य करायचे मात्र आता गुन्हेगार असलेल्या उमेदवारांचेच प्रमाण धक्कादायक पद्धतीने वाढत आहे. कुसुमाग्रजांनी एका कवितेत म्हटलं होतं , 'थैलीत लोकशाही जेव्हा शिरे धनाच्या ,तेंव्हा महासतीची वारांगनाच होई '.आज सर्वसामान्य लोक खंक होत आहेत ,आणि सत्तेचे भोई असलेले उद्योगपती व राजकारणी गुणकाराच्या श्रेणीने अतिश्रीमंत होत आहेत.

       राष्ट्रपिता महात्मा गांधींनी एकदा म्हटलं होतं , हुकूमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत  प्रलोभानाची भीती असते.' आज लोकशाहीला दमन आणि प्रलोभन या दोन्हीचाही धोका जाणवतो आहे. वास्तविक आपण राजेशाही ,साम्राज्यशाही घालवून लोक शक्तीच्या बळावर  लोकशाही प्रस्थापित केलेली आहे.म्हणूनच हे राष्ट्र प्रजासत्ताक नव्हे तर  'लोकसत्ताक ' आहे. जिथे राजा तिथे प्रजा असते.लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता असते हे या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्तेचे अंतिम मालक 'लोक' असतात निवडून दिलेली मंडळी 'कारभारी' असतात हे गृहीत आहे.कारभारी चुकले तर त्याला जाब मालक विचारु शकतो.मात्र आज निवडून दिलेली कारभारी मंडळीच मालकाप्रमाणे, राजाप्रमाणे ,हुकूमशहा प्रमाणे वागू लागली आहेत. हे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचेच निदर्शक आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे हे प्रसिद्धीपत्रक  स्वागतार्ह आहेच. मात्र त्याच बरोबर निवडणूक आयोगाने गुन्हेगारी आणि काळा पैसा यांनी लोकशाही समोर निर्माण केलेल्या आव्हाना बाबत अधिक गंभीर व सक्रिय होण्याची गरज आहे.


             ( लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली एकतीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती 'मासिकाचे संपादक आहेत.)

 

Post a comment

0 Comments