प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले


मिरजेत पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

PRESS MEDIA LIVE : मिरज : 

मिरज : बेकायदेशीरपणे सुरू असलेला महापालिकेचा कत्तलखाना, ग्रामीण भागातील निकृष्ट दर्जाची रस्ते आणि बांधकामे आणि अपंगांसाठीचे साहित्य वाटपाविना पडून असलेले साहित्य यासह अनेक विषयांवर सदस्यांनी पंचायत समितीच्या प्रशासनाचे अक्षरशह वाभाडे काढले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या सभेत सदस्यांनी पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. यावेळी सदस्यांनी पंचायत समिती प्रशासनाचे कारभारावर नियंत्रण नसल्याचा थेट आरोप केला.

सभेच्या प्रारंभी सदस्य अनिल आमटेवणे यांनी बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कत्तलखाना कोणाच्या मेहरबानीवर सुरू आहे? असा सवाल करून येत्या काही दिवसात हा कत्तलखाना बंद झाला नाही तर ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून या कत्तलखान्याच्या पाठीशी असणाऱ्यांचे पितळ उघडे पाडू असा थेट इशारा दिला.यावेळी आमटवणे यांनी या कत्तलखान्या संदर्भात महापालिकेतील प्रशासन आणि काही कारभारी तसेच महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबंधे असल्याचाही आरोप केला.

कर्नाटकातून चोरट्या मार्गाने पद्धतीने रोगट आणि भाकड जनावरे आणून त्यांची याठिकाणी कत्तल केली जाते आणि त्यांचे मास गोरगरिबांना स्वस्तात विकण्याचा गोरखधंदा महापालिकेने ठेकेदाराच्या सहाय्याने चालवला असला तरी ही बाब नागरिकांच्या जिवावर बेतणारे आहे याचे भान महापालिका प्रशासन आणि आणि तेथील कारभाऱ्यांना नसेल तर आम्ही पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थ ही जाणीव करून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही यावेळी आमटवणे यांनी स्पष्ट केले.


सदस्य किरण बंडगर यांनी या प्रकरणात ग्रामपंचायतीला वगळून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाने कत्तलखाना बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली. याबाबत अनेक सदस्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सदस्य अशोक मोहिते यांनीही यामध्ये अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याशिवाय हा जीवघेणा कारभार होऊ शकत नाही असाही आरोप केला.

सदस्य कृष्णदेव कांबळे यांनीही या सगळ्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी केली. दरम्यान सदस्य अशोक मोहिते यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या तसेच अन्य कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतानाही त्याची राजरोसपणे बिले जातात असा आरोप केला. तसेच यामध्ये स्थानिक सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी तालुक्‍यातील अपंगांसाठी शासनाकडून आलेले साहित्य गेल्या तीन वर्षांपासून वाटपाविना पडून आहे आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याच्या आरोप केल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांकडून लगेच हे अडगळीत पडलेले हे साहित्य वाटपासाठी बाहेर काढण्यात आले. आण परंतु हे सगळे थोतांड आहे असेही कांबळे यांनी यावेळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

          रस्त्यावर उतरू...

एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे महापालिका कत्तलखान्याच्या माध्यमातून दररोज हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर हा खेळ आम्ही रस्त्यावर उतरून बंद पाडू असा इशारा सदस्य अनिल आमटवणे यांनी देताच सदस्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच आमटवणे यांना जोरदार पाठिंबा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post