पुरबाधित गावात नागरिकांचे

      
          

पुरबाधित गावात नागरिकांचे स्थलांतर सुरूच.

PRESS MEDIA LIVE    कोल्हापूर , 

जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, पंचगंगेच्या पातळीत दिवसभर वाढ सुरूच होती. पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे जात आहे. पंचगंगेचे पाणी शहरात जामदार क्लबच्याही पुढे आले आहे. कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर उदगावजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले असून, सध्या केवळ दोन दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूरबाधित गावांत नागरिकांचे आजही स्थलांतर सुरूच होते. गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने आज अनेक ठिकाणी उसंत दिली. सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली होती.अधूनमधून पावसाची जोरदार सर कोसळत होती, त्यानंतर पुन्हा उघडीप, असेच चित्र दिवसभर दिसत होते. पावसाचा जोर ओसरल्याने धरणांत होणारी पाण्याची आवक कमी होत आहे. राधानगरी

धरणात येणारे पाणी कमी झाल्याने मंगळवारी पहाटे 4 वाजून 37 मिनिटांनी धरणाचा तीन आणि सहा क्रमांकाचे दोन स्वंयचलित दरवाजे बंद झाले. धरणाचे चार व पाच क्रमांकाचे दोन स्वंयचलित दरवाजे खुले असून त्यातून 2856 क्यूसेक्स तर वीज निर्मितीसाठी 1400 क्यूसेक्स असा एकूण 4 256 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दुधगंगा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. धरणातून सध्या 7 हजार 700 क्यूसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासह चिकोत्रा वगळता अन्य सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. वारणा धरणातून 12 हजार 264 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. कृष्णा आणि वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यात पंचगंगेची पातळी वाढत आहे. कुरूंदवाड शहरातील नदीकाठच्या भागात पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर उदगाव जवळील ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक जयसिंगपूर-उदगाव मार्गे सुरू करण्यात आली आहे.


आज सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 39.9 इंचावर होती. इशारा पातळी गाठल्यानंतर पंचगंगेचे पाणी संथगतीने पुढे सरकत होते. पावसाचा जोर कमी झाला, राधानगरीचेही दोन दरवाजे बंद झाले. यामुळे पंचगंगेची पातळी स्थिर राहील अशी शक्यता होती. मात्र, त्यात वाढच होत आहे. दिवसभरात सव्वा फुटांने पंचगंगेची पातळी वाढली. रात्री नऊ वाजता पातळी 41 फुटावर गेली. रात्री पंचगंगेचे पाणी जामदार क्लबपर्यंत पुढे सरकले होते. पावसाचा जोर पुन्हा वाढला, तर उद्या पर्यंत पंचगंगा धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तरीही पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ एक दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरचा पुराचा धोका अद्याप कायम आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगत पाणी आले आहे.

दरम्यान अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग 2 लाख 50 हजार क्यूसेक्सने सुरू आहे. या धरणाची पाणी पातळी आता 518.32 मीटर इतकी झाली असून धरणात 102.41 टी.एम.सी.पाणीसाठा झाला आहे. पावसाने उद्याही उघडीप दिली, अलमट्टीतून सुरू असलेला विसर्ग कायम राहिला तर जिल्ह्यातील पूर वेगाने ओसरण्यास मदत होणार आहे.

पंचगंगेची पाणी पातळी वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांची स्थलांतराची मोहीम आजही सुरूच ठेवली. जिल्ह्यातील चार गावांमधील 1709 व्यक्‍तींचे व 16 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. करवीर तालुक्यातील बाधित चिखली व आंबेवाडी गावातील 1510 व्यक्‍तींना तर चंदगड तालुक्यातील बाधित एका गावातील 41 कुटुंबातील 184 व्यक्‍ती व 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे.


जिल्ह्यात 85 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्यावरील वाहतूक बंद असल्याने 170 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे. हिरण्यकेशी नदीवरील चार बंधार्‍यावरील पाणी ओसरले आहे. अद्याप या नदीवरील 8 बंधारे पाण्याखालीच आहेत. यासह पंचगंगेवरील सात, भोगावतीवरील सहा, तुळशीवरील तीन, कासारीवरील आठ, कुंभीवरील चार, धामणीवरील पाच, वारणेवरील आठ, कडवीवरील आठ, दुधगंगेवरील सात, वेदगंगेवरील नऊ, घटप्रभेवरील सहा तर ताम—पर्णीवरील पाच बंधार्‍यांवर पाणी आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 42.73 मि.मी. इतका पाऊस झाला. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे सर्वाधिक 108 मि.मी.पाऊस झाला. चंदगडमध्ये 46.33 मि.मी., आजर्‍यात 42.75 मि.मी., भुदरगडमध्ये 48.40 मि.मी., कागलमध्ये 28.71 मि.मी., करवीरमध्ये 43.64 मि.मी., राधानगरीत 49.83 मि.मी., शाहूवाडीत 52.50 मि.मी., पन्हाळ्यात 50.71 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 17 मि.मी., हातकणंगलेत 18.38 मि.मी. तर शिरोळमध्ये 6 मि.मी.पाऊस झाला. जिल्ह्यातील दहा धरणक्षेत्रातही गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली. दिवसभरात मात्र, पावसाचा जोर कमी झाला.

Post a comment

0 Comments