हडपसरच्या वॉरियर आजींची कमाल

 हडपसरच्या ‘वॉरिअर आजीं’ची कमाल…घेतला कौतुकास्पद निर्णय, तुम्हीही कराल सलाम

अभिनेता सोनूने सूदने दिला होता मदतीचा शब्द

PRESS MEDIA LIVE :  हडपसर

हडपसर – रामटेकडी- गोसावीवस्ती येथील “वॉरिअर आजी’ शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याबाबत अभिनेता सोनूने सूदने दिलेला शब्द पाळला आहे. पण, ही मदत आर्थिक स्वरुपाची नसून स्वाभिमानाने जगायला देणारी आहे. मुला-मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी-काठी चालवण्याचे मोफत प्रशिक्षण या आजी देणार आहेत. त्यासाठी त्यांना सोनू सूद यांच्याकडून दरमहा मानधन देण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही हडपसर येथे झाली आहे.

ससाणेनगर येथील सावली फाउंडेशनने यासाठी संस्थेची जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे. तर मुंबई येथील निर्मिती फाउंडेशनचे सहकार्य या ट्रेनिंग सेंटरला मिळाले आहे. या केंद्राचे उद्घाटन सावली फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदीनी जाधव, निर्माता फाउंडेशनचे कार्यकर्ते मनोज खरे, नीलेश शेळके, रोहित सकपाळ, हर्षाली खरे, सुरज खरे, मयुर घायवट, सनी साळवे, मिलींद राऊत आदी उपस्थित होते.

करोना आणि लॉकडाऊनच्या काळातही लाठ्या-काठ्यांचा खेळ खेळून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या हडपसर येथील 85 वर्षांच्या आजीबाई सोशल मीडियावर “वॉरिअर आजी’ झाल्या. शांताबाई पवार यांना मदत करण्याची तसेच एक प्रशिक्षण शाळा तयार करण्याची इच्छा अभिनेता सोनू सूद यांनी व्यक्त केली होती.

सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, “सावली फाउंडेशनची जागा या प्रशिक्षण केंद्रासाठी भाड्याने द्यावी, अशी सोनू सूद यांनी विनंती केली. मात्र, आम्हाला भाडे नको. पण या सेंटरमध्ये मुलामुलींना मोफत प्रशिक्षण देण्याची अट मी त्यांना घातली. त्यानुसार या जागेत आठवड्यातून तीन दिवस या पवार आजी प्रशिक्षण देणार आहेत.

शांताबाई पवार म्हणाल्या, “उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते. करोनाची भीती होती. मात्र घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले. अभिनेता सोनू यांच्या पुढाकारातून मुला-मुलींना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड झाल्याने समाधान वाटते.’

Post a comment

0 Comments