कुडाल :


माझ्या मतदार संघातील जनतेला त्रास खपवून घेणार नाही

कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी सुनावले खडेबोलहायवे मोबदल्यासाठी प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्याने लाच मगितल्याचा प्रकार उघड

PRESS MEDIA LIVE :  कुडाळ :

मुंबई-गोवा महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे त्या भूमिपुत्रांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी एका बँकेच्या कर्मचाऱ्या मार्फत लाखो रुपये प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याकडून मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका प्रकल्पग्रस्त जमीनदाराने आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास सोमवारी आणून दिला.त्यानंतर आमदार नाईक यांनी बँक व प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारला.गेले अनेक दिवस कुडाळ प्रांत अधिकाऱ्यांच्या जनतेतून तक्रारी येत होत्या.आता हे प्रकार उघडकीस येत आहेत.याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात भ्रष्टाचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, लोकांना त्रास झालेला खपवून घेणार नाही. कुडाळ मालवणसह जिल्ह्यात भ्रष्टाचारी अधिकाऱयांना थारा देणार नाही.असे खडेबोल आ.वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांताधिकारी सौ वंदना खरमाळे यांना सुनावले.प्रांताधिकारी म्हणून तुम्ही चौकशी करा तुमच्या कार्यालयाचे नाव सांगत एका अधिकाऱ्याने पैसे घ्यायला सांगितले असे उघडकीस आले आहे. नसेल तर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार द्या असे आमदार वैभव नाईक यांनी  सांगितले.

दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात लोकांकडून कामासाठी पैसे घेतले जातात असा थेट आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.हायवे प्रकरणी जमीन मालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात आहेत या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही  पालकमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या उर्वरित जमीन मालकांची मोबदल्याची रक्कम प्रांताधिकारी कार्यालयात आली आहे. ती वितरित करण्यात येत आहे.मात्र याबाबत त्रुटी काढून प्रांत कार्यालयातील अधिकारी पैसे उकळतात असा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

 *पाच लाखांची केली मागणी*

पिंगुळी येथील मांगीलाल परमार या जमीन मालकाच्या जमिनीचा मोबदला कुडाळ येथील इंडस बँकेच्या शाखेत जमा झाला होता. याबाबत 9 जून ला नोटीस काढण्यात आली होती. रक्कम अदा करणाऱ्या सावंत नामक बँक कर्मचार्‍यांशी त्यांनी संपर्क केला असता तुमच्या प्रकरणात त्रुटी आहेत.त्यामुळे पाच लाख रुपये द्या मग त्या तात्काळ दूर करून पैसे देण्यात येतील असे सांगितले.यापुढे परमार यांनी प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता हरकतींवर सुनावणी साठी तारीख लावण्यात आली

  *अडीच लाखाला करण्यात येत होते समेट*

रमार यांनी आपण पाच लाख रुपये देऊ शकत नाही असे सांगत असमर्थता दर्शविली.याप्रकरणी  29 जून रोजी पुन्हा तारीख लावण्यात आली होती. तत्पूर्वी परमार यांनी संपर्क साधला असता प्रांत कार्यालयाकडून तुम्ही पैसे द्या मग तुमचा मोबदला देण्यात येईल असे सांगण्यात आले.त्यानुसार अडीच लाख रुपये देण्याचे ठरवले ही तसाच चेकही लिहिण्यात आला. मात्र याबाबतची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांना परमार यांनी आधी सांगितली असल्याने पैसे द्यायचे नाही असे सांगितले. लिहिलेला चेक न देता तसाच ठेवला. 

 *आमदार नाईक यांचे वेधले लक्ष*

हायवेच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी लाखो रुपये मागितले जात असल्याचा प्रकार शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे व कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांच्या कानी घातला.जमीनदार व बँक कर्मचारी यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले ते ऐकताच आ.नाईक संतप्त झाले. प्रांताधिकारी कार्यालयाकडून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे आरोप होतात, आता तर पुरावा हाती आला आहे. योग्य वेळी हा प्रकार थांबविला पाहिजे असे सांगत आ.नाईक व सहकाऱ्यांनी इंडस बँक  गाठली.

 *प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्याचे घेतले नाव*
  
आपण स्वतः पैसे घेत नव्हतो तर प्रांताधिकारी कार्यालयातून आपणास पेमेंट करण्यापूर्वी काही रक्कम सेल्फ चेक स्वरूपात घेण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीपासून नाव सांगण्यास तयार होईना कॅमेरा बंद करा मला त्रास होणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेता काय असे विचारले, जबाबदारी घेतो असे सांगितल्यावर प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे त्याने आपल्या शाखा व्यवस्थापकाचा समोरच नाव सांगितले.

 *आमदारांनी  गाठले थेट प्रांत कार्यालय*

त्यानंतर आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठले.आर्थिक व्यवहार व शासकीय कार्यालय असल्याने आ.नाईक यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस आल्यानंतर प्रांताधिकारी यांना निरोप देण्यात आला.तर वंदना खरमाळे स्वतः बाहेर आल्या.आ.नाईक यांनी हा प्रकार सांगितला.याबाबत आपण आत बसून चर्चा करुया असे प्रांताधिकार्‍यांनी  सांगितले.

 *प्रांताधिकारी यांना ऐकविल्या ऑडिओ क्लिप*

आमदार नाईक यांनी बँकेच्या कर्मचाऱ्याने प्रांताधिकारी कार्यालयाचे नाव सांगून एका प्रकल्पग्रस्ताकडून लाखो रुपयांची मागणी केली असे सांगत हा कर्मचारीच समोर उभा केला. त्या कर्मचार्‍याने बँकेत काय सांगितले हे त्याच्या शाखाधिकारी यांच्या तोंडुनच प्रांताधिकार्‍यांना ऐकविले. प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून पैसे घेण्यास सांगितल्याने आपण पैसे घेतल्याचे त्यांनी सांगितले.असे आ.नाईक यांनी तो कर्मचारी सांगत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सौ.खरमाळे यांनी आपण अगर कार्यालयातील अन्य कोणी पैसे घेण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

 *आमदारांनी केला संताप व्यक्त*
 
कुडाळ तालुक्यातील जमीनदार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा मोबदला देण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत.हे धक्कादायक आहे. यापुढे असेच चालू देणार नाही.लोकांना त्रास झालेला खपवून घेतला जाणार नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करा असे प्रांताधिकारी यांना सांगून अन्य कामाबरोबर वाळू व्यावसायिकांकडूनही पैसे घेतले जातात या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. हे लांच्छनास्पद असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगून तीव्र संताप व्यक्त केला. आपण पैसे घेण्यास कधीच याला सांगितले नसल्याचे सौ खरमाळे यांनी सांगितले.यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब म्हणाले, खासदार ,पालकमंत्री आमदारांनी पाठपुरावा करून लोकांचे पैसे आणले आणि असा प्रकार होत असेल तर योग्य नाही असे सांगितले. यावेळी राजन नाईक,अतुल बंगे ,राजू गवंडे,सचिन काळप,राजू जांभेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

 *तर प्रांताधिकार्‍यांनी तक्रार द्यावी*

बँक कर्मचाऱ्याने प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी पैसे घेण्यास  सांगितले असे सांगितले आहे.जर प्रांत कार्यालयातील कोणी सांगितले नसेल तर प्रांताधिकार्‍यांनी त्या बँक कर्मचाऱ्या विरोधात तक्रार दाखल करावी असे आ.नाईक यांनी सांगितले.

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रष्टाचारी अधिकारयांना थारा देणार नाही*

 गेले अनेक दिवस कुडाळ प्रांत अधिकाऱ्यांच्या जनतेतून तक्रारी येत होत्या. प्रांताधिकारी कार्यालयात कामासाठी पैसे घेतात अशा तक्रारी होत्या.माझ्या मतदारसंघात यापुढे असे होऊ देणार नाही, लोकांना त्रास झालेला खपवून  घेतला जाणार नाही.कुडाळ मालवण मतदार संघासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रष्टाचारी अधिकारयांना थारा देणार नाही.असे आ.वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

Post a comment

0 Comments