गांधी भवन मधील 'रोजा इफ्तार' मधून सर्व धर्मीय स्नेहाचे दर्शन !


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल या संघटनांच्या वतीने आयोजित 'रोझा इफ्तार ' कार्यक्रमातून  सर्वधर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे दर्शन घडले .

  बुधवार,दि.२७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधीभवन,कोथरूड येथे 'रोजा इफ्तार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'निर्भय बनो आंदोलन' चे एड .असीम सरोदे,रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी,इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला , फादर  पीटर डिक्रुझ , मौलाना इसहाक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन , प्रशांत कोठडीया, माजी  पोलिस अधिकारी मिलिंद गायकवाड, डॉ. प्रवीण सप्तर्षी, नीलम पंडित, प्रसाद झावरे हे देखील उपस्थित  होते.युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर,संघटक अप्पा अनारसे,पुणे शहराध्यक्ष मुस्कान परवीन बाबासाहेब, सुदर्शन  चखाले यांनी स्वागत केले.

बंधूता निर्माण करण्याचा संकल्प: डॉ. कुमार सप्तर्षी

--------------

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ' उपवासाचा काळ हा आत्मशुद्धीचा काळ आहे. रोझा इफ्तारचे आयोजन हे महात्मा गांधींच्या एकतेच्या विचाराशी सुसंगत आहे. सर्वांनी एकत्र राहणे ही भारताची गोडी आहे, ती जगाला कळाली आहे '

अॅड. असीम सरोदे म्हणाले, ' सर्वधर्मीय सण एकत्र साजरे झाले तर एकात्मता वाढेल 'कोथरुड मशिदीचे मौलाना इसहाक यांनी रमझान चे महत्व विषद केले.

राहुल डंबाळे म्हणाले, ' कोथरूड भागात होणारा इफ्तार कार्यक्रम नवी दिशा देणारा आहे. अशा कार्यक्रमाने एकता वाढीस लागेल '.

लुकास केदारी म्हणाले, ' या कार्यक्रमामुळे दया, क्षमा, शांती वाढीस लागेल. समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन फॅसिस्ट वृत्ती लांब ठेवल्या पाहिजेत '.

फिरोज मुल्ला म्हणाले, ' गांधी भवन हे एकात्मतेचे केंद्र आहे. हे पुन्हा दिसून आले '.

'आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य बळकट केले पाहिजे, असे पैगंबर शेख यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post