काळाराम मंदिर सत्याग्रह व आजचे वास्तव



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

शनिवार ता.२ मार्च २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली त्याला ९४ वर्ष पूर्ण झाली. अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह होता. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर शेकडो सत्याग्रही सहभागी झाले होते. तत्पूर्वी ऑक्टोबर १९२९ मध्ये पर्वतीवरील मंदिरात अस्पृश्यना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी सनातन्यांनी सत्याग्रहीना मारहाण केलेली होती. नाशिक मध्येही असा हल्ला झाला. पुढें पाच वर्षानी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी काळाराम मंदिर अस्पृश्याना खुले करण्यात आले. 


' मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्यांच्या गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठीची चळवळ आहे. आम्हाला हिंदू आपले म्हणत आहेत काय ? व आम्हाला समतेची वागणूक मिळत आहे काय ?हे आम्हाला पाहायचे आहे ' अशी भूमिका आंबेडकरांनी जाहीर केली होती. २ मार्च १९३० रोजी नाशिक मधील भाषणात ते म्हणाले,"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."


तत्पूर्वी तीन वर्षे म्हणजे २० मार्च १९२७ रोजी  आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते,' हा लढा पाण्यासाठी नसून समतेसाठी आहे.अस्पृश्यांना गावोगावच्या पाणवठ्यावर  पाणी भरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागते आहे.'आपण माणूस असून माणसासारखे जगण्याचा आपल्याला हक्क आहे काय हे पाहण्यासाठी हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता. माणसांच्या सहवासाने तळे बाटते आणि जनावराच्या मलमुत्राने त्याची शुद्धी होते हा प्रकार  त्यांनी उघड केला.आणि २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाडला सत्याग्रह परिषद घेऊन मनुस्मृतीचे दहन केले.


आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्व मोठे आहे. चातुर्ण्यावर अधिष्ठित वर्ण वर्चस्वाचा पुरस्कार करणाऱ्यांनाच नव्हे तर इंग्रजी राज्यकर्त्यानाही जाग येण्यासाठी त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व माणूस म्हणून असलेले मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा हा अंतीम टप्प्यातील कालखंड  होता. महात्मा गांधी निरनिराळ्या आंदोलनातून जनजागरण करत होते.राजकीय स्वातंत्र्यासाठी काँग्रेस ब्रिटिशांशी लढत होत.तर इथल्या वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतावादी व्यवस्थेविरोधात,

धर्ममार्तंडशाही विरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. 

१९२९च्या ऑक्टोबर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित केले होते. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली.नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड हे समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण देव  होते. घ्या समितीत पांडुरंग सबनीस , सावळेराम दाणी ,तुळशीदास काळे ,शिवराम मारू, गणपतराव कानडे ,अमृतराव रणखांबे, रावबा ठेंगे,संभाजी रोकडे ,नाना चंद्रमोरे, रंगनाथ भालेराव, महंत बर्वे ,भगवान बागुल, लिंबाजी भालेराव आदी सदस्य होते. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली. मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे  प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असे सांगितले.


अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये डॉ. आंबेडकरांना अनेक कटू अनुभव आले.आपला धर्म आपल्याला व आपल्या बांधवांना माणूस म्हणून अधिकार देण्यास तयार नाही हे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी धर्मांतर आवश्यक आहे असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले. १३ऑक्टोबर १९३५  च्या येवला येथील मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषदेत ते काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या पाच वर्षांनंतरच्या अनुभवाचा व इतर बाबींचा उल्लेख करून म्हणाले म्हणाले की, ' साधे मूलभूत हक्क आम्हाला लागू देण्यासाठी ' स्पृश्य ' म्हणून गणल्या गेलेल्या हिंदू लोकांची मनधरणी करण्याच्या निरर्थक प्रयत्नात जे काही थोडेसे द्रव्य साधन आम्ही जमा केले होते तेही खर्ची घालून बसलो. त्यांच्याकडून झालेली कल्पनातीत मानखंडनाही आम्ही सहन केली. पण हा सारा स्वार्थत्याग निष्कळ ठरला. निमूटपणे व धीमेपणे आजपर्यंत आम्ही जे जे हाल सहन केले त्याचा यत्किंचितही परिणाम या हिंदू लोकांच्या अंतकरणावर झालेला दिसून आला नाही.आम्ही दुसऱ्या धर्माचे अनुयायी असतो आणि त्यावेळीही आत्ताचेच  आमचे उदरनिर्वाहाचे उद्योगधंदे आम्ही पत्करीत असतो तर ह्या हिंदू लोकांना आम्हाला आताप्रमाणे अपमानकारक रीतीने जगावण्याचा किंचित ही धीर करावला असता का ?..... ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाने राहता येण्यास सुद्धा मज्जाव केला जात आहे. त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे?..... दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो. पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापी हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे.आणि मी ते करणारच याबद्दल मुळीच संशय नको.मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ,हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही..!'


 पुढे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे ऐतिहासिक समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.२१ वर्षे पूर्ण विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला होता. याचा दुसरा अर्थ या२१ वर्षात माणसाचे माणूस पण नाकारण्याच्या आणि माणसापेक्षा कुत्र्या, मांजरांना ,पशुपक्ष्यांना महत्त्व देणाऱ्या सनातन्यांच्या भूमिकेत बदल झालेला नव्हता. धर्मांतरानंतर अल्पावधीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब कालवश झाले. त्यालाही आता सात दशके होत आलेली आहेत. मात्र मी वर्ण विषमतेची कीड अजूनही संपलेली नाही. 


आंबेडकर म्हणाले होते,' जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजेच धर्मांतर होय. 'धर्मांतर 'हा शब्द कोणाला आवडणारा नसला तर त्याला ' नवजीवन 'म्हणता येईल. परंतु नवजीवन मृतदेहात प्रवेश करत नसते. नवजीवन नव्या शरीरातच संचारते.याचाच अर्थ जुन्या शास्त्रप्रामाण्यावर आधारलेला धर्म नष्ट झाला पाहिजे.' अर्थात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा मूळ गाभा स्वीकारला आणि त्याची आधुनिक संदर्भात मांडणी केली. डॉ. रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे,' आंबेडकरांना बौद्ध धर्माची आवश्यकता उद्या येऊ घातलेल्या राजकीय परिवर्तनाला सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या आधाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वाटत होती.' याचाच अर्थ स्वातंत्र्यानंतरचा भारत माणसा माणसात जन्माच्या आधारे भेद न करणारा, विषमतावादाला थारा न देणारा,समतेच्या दिशेने जाणारा असेल ही आंबेडकरांची भूमिका होती.


बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत आदी वृत्तपत्रातून हा जागर करण्याचा प्रयत्न केला. माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या परिषदा भरवून जनजागरण केले. १९२८ मध्ये सायमन कमिशनला अस्पृश्याच्या कल्याणासाठी ब्रिटिश सरकारने कसे धोरण स्वीकारावे याचे निवेदन दिले. १९३५ साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला.१९४२  मध्ये ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस फेडरेशन हा राष्ट्रीय पक्ष स्थापन केला. विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र ,समाजशास्त्र ,धर्मशास्त्र याविषयी विपुल स्वरूपाचे सैद्धांतिक लेखन केले.


 आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यानंतरही अस्पृश्याने मंदिरात प्रवेश केला, नवे कपडे घातले , लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसला, शाळेच्या पिपातील पाणी प्याला अशा अनेक कारणांवरून मारहाण होण्याचे ,जीव घेण्याचे विषारी प्रकार घडत आहेत. वरिष्ठ व सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीनाही महत्त्वाच्या धार्मिक समारंभात डावलल्याची उदाहरणेही समोर आहेत.९४ वर्षापूर्वीचा काळाराम सत्याग्रह आणि आजची रामराज्याच्या परिभाषेचा  काळ यात काही गुणात्मक फरक पडला आहे का ?याचा विचार करण्याची गरज आहे.म्हणूनच काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या  वर्धापदिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था, तिची यंत्रणा,उगम आणि विकास आणि तिची अर्थहीनता, तिच्या नष्टतेचे मार्ग,याबाबत मांडलेले विचार आजही महत्त्वाचे ठरतात. विकासाच्या परिभाषेमध्ये माणसाचा आणि माणुसकीचा विकास हा अग्रक्रमावर असण्याची नितांत गरज आहे. सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेची ती पूर्व अट आहे. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाच्या तो संदेश आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post