भारतीय संस्कृती

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

अलीकडे राजकारणाच्या भाषण बाजी मध्ये संस्कृतीचा अभिमान, दुराअभिमान, गर्व ,लाज वगैरे शब्द घाऊक प्रमाणात येत आहेत.मात्र खरी भारतीय संस्कृती काय आहे ? हे समजून न घेता ही विधाने केली जातात. संस्कृती या शब्दाचा अर्थ चांगले करणे असा आहे .जीवनाच्या अंतर्बाह्य  उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. भारतीय संस्कृती म्हणजे केवळ अध्यात्म नव्हे,केवळ आर्यत्व नव्हे , केवळ हिंदुत्व नव्हे तर संपूर्ण भारतीयत्व होय.माणसाला कर्तव्याचा मार्ग दाखवते ती संस्कृती असते. अनेका देखता आणि एकतेत विविधता हे आपले संस्कृतीक वैशिष्ट्य आहे. मानवी संस्कृती संस्काराने विकसित झाली आहे. सत्य, अहिंसा आणि नैतिकता यांचे त्यात मोठे महत्त्व आहे. 

प्राचीन भारतीय संस्कृतीतील उदार तत्वांचा ,मूल्यांचा आपल्याला विसर पडत चालला आहे .अनेक धर्माची निर्मिती झालेली ही भूमी आहे.अनेक संत माणसांच्या वैचारिक योगदानाने श्रीमंत बनलेला आणि विविधतेतून एकतेची शिकवण जगाला देणार हा देश आज आपलीच माणसे अस्वस्थ झाल्याचे पाहतो आहे .अर्थात याची कारणे अनेक आहेत .पण मुख्य कारण म्हणजे विचार, संस्कार आणि  आचार यांना एका संकुचित कोंडीत पकडून त्यावर  स्वार होण्याचे प्रयत्न केले गेले. ते अनुचित होते. विचारातील व्यापकता ठेवणारी आणि वेळोवेळी ते दाखवून देणारी मानसिकता नष्ट करण्याचे प्रयत्न काही मंडळींनी चालवले. स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेष महत्त्वाचा मानला जावा ही विनाशकाले वपरीत बुद्धी असते. भारतीय लोकमानस हे मुळातच द्वेषापेक्षा प्रेमाशी जवळीक साधणारे आहे. अर्थात हे माहीत असूनही त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न करणारे अनेक वैचारिक प्रदूषक हे वैचारिक दहशतवादी आणि अतिरिकेचअसतात.

व्यापक व सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीलाही राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. संस्कृतीच्या नावाखाली द्वेष , मत्सर,आणि क्रौर्य यांची पेरणी केली जात आहे. संस्कृतीला काळीमा असणाऱ्या घटना घडवल्या जात आहेत.भारताच्या एकजिनसी संस्कृतीशी ज्यांची नाळच जुळलेली नाही ती अतिरेकी विचारांची मंडळी चे कार्य करत असतात. वापरा आणि फेका या नव्या बाजारी नियमाप्रमाणे संस्कृतीलाही केवळ वापरायचा आणि काम झाले की फेकायचा च्या कार्यक्रम काही मंडळी करत असतात.हे एक फार मोठे सामाजिक ,राजकीय संकट आहे. राजकीय संकटा विषयी लेनिन यांनी एक ठिकाणी म्हटले आहे की,'  कोणतेही राजकीय संकट उपयुक्त असते. कारण अंधारात वावरणाऱ्या गोष्टी त्यामुळे उजेडात येतात. आणि राजकारणात वावरणाऱ्या शक्तींचे यथार्थ दर्शन घडते. त्यामुळे असत्य आणि थापेबाजी उघडकीस येते. वस्तुस्थितीचे समग्र अधिक दर्शन होऊन वास्तविक परिस्थितीचे ज्ञान संकटामुळेच जनतेच्या डोक्यात उतरते.' अर्थात भारतीय संस्कृतीशी द्रोह करणाऱ्यांच्या कारवाया आता जनतेच्या लक्षात येऊ लागल्या आहेत . है स्वच्छ राजकीय व सांस्कृतिक पर्यावरणाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.

भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत प्रतिक म्हणून ज्यांना विसाव्या शतकातील जगातील सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून गौरवले त्या महात्मा गांधींनी भारतीय संस्कृती संदर्भात काही महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत. गांधीजी म्हणतात ,' आपण एका ग्रामीण संस्कृतीचे वारसदार आहोत.आपल्या देशाची विशालता, देशाची ठेवण, हवा ,पाणी या देशाची संस्कृती ग्रामीण असल्याचे सिद्ध करतात. स्वतःच्या संस्कृतीचे संरक्षण म्हणजे इतरांच्या संस्कृतीचा तिरस्कार नव्हे .इतर संस्कृतीत जे उत्कृष्ट व सुंदर असेल ते आपल्या संस्कृतीत आत्मसात केल्यानेच आपल्या संस्कृतीचे संरक्षण होऊ शकेल. भारतीय सुसंस्कृतता हा वेगवेगळ्या धर्मातून व्यक्त झालेल्या संस्कृतीचा संगम आहे. ज्या भौगोलिक परिस्थितीत त्यांचा मिलाफ झाला त्या परिस्थितीचा प्रभावही त्या संस्कृतीवर पडला आहे. ती सर्व  संस्कृतीचा संगम आहे.'

गांधीजी पुढे म्हणतात की,'  प्राचीन संस्कृतीच्या गुप्त भांडारात पाहताना मला असे दिसून आले की हिंदू संस्कृतीत शाश्वत्व, चिरंतन म्हणून जे आहे तेच येशूच्या, बुद्धाच्या, महमदाच्याही  शिकवणुकित आहे. सत्य आणि अहिंसा यांच्या इतके प्राचीन अन्य काहीही नाही. अशा निष्कर्षाप्रत मी बारीक चिकित्सेनंतर आलो आहे.भारतीय संस्कृती संग्राहक आहे ,ती सर्वांना जवळ करणारी आहे , संकुचिततेचे  वावडे असणारी ही संस्कृती आहे.'  भारतीय संस्कृती ही सांताकडून अनंताकडे जाणारी ,अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ,भेदातून अभेदा कडे जाणारी, चिखलातून कमळाकडे जाणारी,विरोधातून विकासाकडे जाणारी,विचारातून विवेकाकडे जाणारी, गोंधळाततून व्यवस्थेकडे जाणारी, आरडाओरडीतून संगीताकडे जाणारी आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सर्व ज्ञान विज्ञान यांचा मेळा. सर्वकाळांचा मेळ. अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पहाणारी, सर्व मानव जातीच्या मेळा मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी अशी थोर भारतीय संस्कृती आहे. असे साने गुरुजींनी म्हटले आहे.

साने गुरुजी एक ठिकाणी म्हणतात,' आज संस्कृती रक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नये म्हणून सनातनी मंडळी किल्ले कोट कवठाळू पाहत आहेत. व आतील प्राण गुदमरवीत आहेत. सनातन या शब्दाचा हे सनातनो नित्य नूतन असा आहे. जे नेहमी नवीन स्वरूप प्रगट करील तेच टिकेल. ज्या झाडाला पालवी फुटेनाशी होती ते झाड मरणार असे समजावे. दुसऱ्याला दुर्जन ठरवून त्याच्या नाशासाठी काही स्वयंघोषित सज्जन काम करताना दिसत आहेत.ते महात्मा फुलेंपासून सर्वच सत्य विधानी मन्फ्लिनातदुर्जन ठरवत आहेत .हे भारतीय संस्कृती वरील अरिष्टच आहे.

भारतीय संस्कृती हे साने गुरुजींचे अप्रतिम पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात,'  संयम हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.मंदिरात कासवाची मूर्ती असते. कासव म्हणजे संयमाची मूर्ती .कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते, क्षणात बाहेर काढते .स्वतःच्या विकासास अवसर असेल तर सारे अवयव बाहेर काढते. स्वतःला धोका असेल तर सारे अवयव आत घेते.असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानले.देवाकडे जायचे तर कासवाप्रमाणे होऊन जा.कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियाचे स्वामी व्हा. वाटेल तेव्हा इंद्रिये स्वाधीन राखता आली पाहिजेत. ज्याला जगाचे स्वामी व्हायचे असेल त्यांनी आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे.

भारतीय संस्कृती आणि कमळ यांचा परस्पर संबंध आहे. अर्थात राजकीय पक्षाच्या कमळ या चिन्हाबाबत आम्ही हे लिहीत नाही. अर्थात तो संबंध लावला जातो हा भाग वेगळा. कारण तसे मानले तर हातापासून कणसापर्यंत आणि नांगरधारी शेतकऱ्यापासून हत्तीपर्यंत अनेक संस्कृतीक प्रतीके लोक माणसात उरलेली आहेत.पण तो मुद्दा वेगळा आहे.कमळ आणि भारतीय संस्कृती याबाबत साने गुरुजींनी फार चांगले विवेचन केले आहे. ते म्हणतात ,'कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतीक आहे .सर्व प्रतिकांचा राजा असे कमळास म्हटले तरी चालेल. ईश्वराच्या सर्व अवयवांना आपण कमळाची उपमा देतो. कमलनयन, कमलवदन, करकमल , पदकमल, हृदयकमल असे म्हणण्यात काय बरे स्वारस्य आहे ?कमळाजवळ अलिप्तपणा हा गुण आहे .पाण्यात असून ते पाण्यावरच राहते .चिखलात असून ते चिखलावर फुलते. कमळ अनासक्त आहे .त्याच्याजवळ अलिप्तता आहे .वाईटातून चांगले घेऊन स्वतःचा विकास करून घेणे हाही गुण आहे .चिखलातूनही ते रमणीयत्व शोधते. रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेवते. सुगंधाने भरून ठेवते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश पाहताच ते फुलते. प्रकाश जातात मिटते .प्रकाश म्हणजे कमळांचा प्राण. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय  ही भारतीय संस्कृतीची आरती आहे. कमळ शतपत्र आहे ,सहस्त्रपत्र आहे .भारतीय संस्कृती सुद्धा शतपत्रांची आहे. शेकडो जाती, जमाती ,अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ याच्यातून सार घेऊन ती वाढत असते.एकेक नवीन पान जोडते. भारतीय संस्कृतीचे कमळ अद्याप पूर्ण फुललेले नाही ते फुलत आहे. विश्वाच्या अंतापर्यंत बोलत राहील. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमल पुष्प होईल. कारण पृथ्वी अनंत आहे .काळ अनंत आहे. ज्ञान अनंत आहे.

भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आपण ध्यानात घेतले पाहिजे. लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा तिच्यात साठलेला आहे. आचार, विचार, आदान प्रदान, संक्रमण यातून संस्कृती विकसित होत असते. प्रकृतीच्या आणि संस्काराच्या संयोगातून संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट होते .प्रकृती म्हणजे निसर्ग .शेतात धान्य पेरल्यावर उगवते ती प्रकृती. पण हे धान्य अधिक चांगल्या प्रकारे यावे यासाठी त्यावर जे संस्कार केले जातात त्याला संस्कृती म्हणतात .समाजातील निरनिराळ्या गटांच्या राजकीय, आर्थिक, कौटुंबिक ,धार्मिक, वांगम्यिन,नैतिक ,कलाविषयक क्षेत्रांमध्ये विविध कालखंडात झालेल्या प्रगतीचा आढावा म्हणजे संस्कृतीचा इतिहास असतो. भारतीय संस्कृतीकडे आपण त्या सम्यक दृष्टिकोनातून पाहिले तर तिची माहिती आणि थोरवी ध्यानात येते.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post