शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

 वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे  निधन झाले . वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. 

पाणीदार आमदार अशी ओळख...

पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी यासाठी जोरकस प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले.

Post a Comment

Previous Post Next Post