विद्यार्थ्यांशी तुच्छतेने वागणारे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना हटवा; आम आदमी पक्षाची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या शिक्षक भरतीच्या जीआर मधील अटीनं विरोधात गेल्या बारा दिवसापासून डी.टी.एड आणि बी.एड. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षण आयुक्तांचे कार्यालय असलेल्या सेंट्रल हॉल बाहेर आंदोलनास बसले आहेत. आंदोलनास बसल्यापासून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट घेतली असता आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला. 

आयुक्तांकडून त्यांना तुम्हाला पुस्तकात लिहिलेली प्रतिज्ञा इंग्रजी मध्ये म्हणता येते का? तुमचा मी दोन दिवसात कार्यक्रम करेल, अशा प्रकारच्या अवहेलनात्मक तसेच धमकी देणारी वक्तव्य केली गेली असल्याचे विद्यार्थ्यांनी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना सांगितले. 


हा सर्व प्रकार पाहून आम आदमी पक्षाने आज शिक्षण आयुक्तांचे कार्यालय असलेल्या सेंट्रल हॉल या इमारती बाहेर अर्धनग्न आंदोलन करताना 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाने पारित केलेल्या जीआरच्या प्रतींची होळी केली तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यात आंदोलन करत्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जाऊ नये या विषयाचे निवेदन दिले गेले.

यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, मराठी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची मातृभाषा आहे. खेडोपाडी राहणारे अनेक लोक हे केवळ मराठी भाषा बोलतात त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना मराठी भाषेचा पर्याय हवा असतो. शासनाने काढलेल्या जीआर चे वाचन केल्यानंतर असे लक्षात येते की ह्या जिआरमध्ये इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे याउलट मराठी भाषिक विद्यार्थ्यांना दुय्यम स्थान दिले जाणार आहे. अशा प्रकारचा भेदभाव जर शासन पातळीवर होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. शासनाचा हा निर्णय मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरीची संधी नाकारू शकतो. त्यामुळे शासनाने हा जीआर तात्काळ मागे घेऊन जीआर मध्ये टाकलेली माध्यमाची अट रद्द करावी. एक वर्षापूर्वी पात्रता परीक्षा घेतलेली आहे, त्यावेळेस माध्यमाची अट नव्हती, त्यातील मेरिट प्रमाणे जागा भराव्यात ही मागणी आहे. तसेच सर्व ६५ हजार रिक्त शिक्षक जागा राज्य सरकारने ताबडतोप भराव्यात.  अन्यथा आम आदमी पक्ष आज केलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून पुणे शहर भाजप कार्यालयाला टाळे लावेलं.

आम आदमी पक्षाच्या शिक्षण आघाडी अध्यक्षा शितल कांडेलकर म्हणाल्या, या ठिकाणी आंदोलनात बसलेली मुले ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजीचे शिक्षण उच्च प्रतीचे मिळतेच असे नाही. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या अटी तात्काळ काढायला हव्यात तसेच ज्या विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती होईल त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी शासनाकडून संधी तसेच मार्गदर्शन दिले गेले पाहिजे. इंग्रजी शाळांची फी ही सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना परवडण्यासारखी नसते त्यामुळे अनेक शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी आपले शिक्षण हे मराठी माध्यमातूनच पूर्ण करतात.


यावेळी आंदोलन करते विद्यार्थी म्हणाले, आम्हाला केवळ माध्यमाच्या अटीविषयी चिंता वाटते आहे. खरे तर शिक्षकांची नियुक्ती ही त्यांच्या योग्यतेनुसार व्हायला हवी त्यात त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचे माध्यम ही अट नसावी. आम्ही शिक्षण देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु आम्हाला उपलब्ध होणाऱ्या संधी या अशा प्रकारच्या अटीमुळे जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम आमच्या भवितव्यावर होऊ शकतो. तसेच शिक्षण आयुक्तांकडून आमच्या समस्या समजून घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नसल्याची खंत यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.

आम आदमी पक्षाच्या वतीने आज केलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, शिक्षण आघाडी अध्यक्षा शितल कांडेलकर, महासचिव अक्षय शिंदे, सतीश यादव, प्रवक्ते धनंजय बेनकर ,महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, निरंजन अडागळे, किरण कद्रे ,ॲड.अमोल काळे, संजय कोने , किरण कांबळे, उमेश बागडे, अमोल मोरे, शाहीन आत्तार, अंजली इंगळे, श्रद्धा शेट्टी,

अनिश वर्गीस, मनोज थोरात, प्रशांत कांबळे, रामभाऊ इंगळे, मिलिंद सरोदे संतोष काळे,अविनाश केंदळे, रवींद्र पाडाळे,  निलेश वांजळे, शेखर ढगे, ज्ञानेश्वर गायकवाड ,संजय कटारनवरे, हरीश चौधरी, खुशबू अन्सारी,बळीराम शहाणे, माधुरी गायकवाड, कुमार धोंगडे, बापू रगसिंग,उत्तम वडवराव, सुरज सोनवणे, अभिजीत गायकवाड, अभिजित वाघमारे, गणेश मोरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post