क्राईम न्यूज : पुणे कॅम्प परिसरामध्ये सराईत गुन्हेगाराचा खून



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : कॅम्प परिसरामध्ये सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली आहे.  पूर्व वैमनस्यातून ही खूनाची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अरबाज बबन शेख (वय ३५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. शेख विरुद्ध 25 गुन्हे दाखल आहेत.

लष्कर भागातील ताबूत स्ट्रीट परिसरामध्ये खाऊ गल्ली आहे या ठिकाणी पहाटे साडेतीनच्या सुमारास तेथे काही मुलांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते, तसेच त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियांका शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

 पोलिसांनी ताबूत स्ट्रीट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून अज्ञात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post