निवडणूक आयोगाला अभ्यासक संशोधकांची ॲलर्जी....

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ तुषार  निकाळजे 

नुकतीच निवडणूक आयोगाने चित्रपट अभिनेता श्री.राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे. एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची एखाद्या क्षेत्रात प्रभाव पाडण्यासाठी प्रशंसा केली जाते, त्याला आयकॉन असे म्हणतात. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रशासनाचा राष्ट्रीय आयकॉन म्हणून चित्रपट अभिनेता राजकुमार राव यांची निवड केली आहे. निवडणूक आयोगाने या निवडी संदर्भात नेमके कोणते निकष वापरले ?  याचा अर्थबोध होत नाही. निवडणूक आयोगाला देखील चित्रपटांसारख्या माध्यमाचा फेमस होण्यासाठी मोह आवरता आला नाही. याची दुसरी बाजू म्हणजे निवडणूक क्षेत्रात कार्य करणारे दिग्गज संशोधक अस्तित्वात असताना चित्रपट अभिनेता निवडीचा फार्स का केला गेला? निवडणूक विषयात संशोधन केलेल्या एखाद्या संशोधकास चित्रपट क्षेत्रात फिल्मफेअर अवॉर्ड, सुपरस्टार पद दिले जाते का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रक्रियेची  चर्चा या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. 

             या संपूर्ण लेखात नमूद केलेल्या श्री. राजकुमार राव या अभिनेत्याचा कोणताही दोष नाही किंवा त्यांची वैयक्तिक बदनामी करण्याचा हेतू नाही. परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या भरकटलेल्या प्रशासकीय व लोकशाहीच्या कण्याचा प्रवास निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

                या लेखामध्ये नमूद केलेला निवडणूक विषयाचा संशोधक मी स्वतः डॉ. तुषार निकाळजे आहे. तसेच मी नागरी सेवक म्हणून 32 वर्ष शासकीय सेवा केली आहे. निवडणुकीचे, जनगणनेचे काम देखील केलेले आहे. माझ्यासारखे आपल्या देशातील हजारो संशोधक किंवा लाखो शासकीय कर्मचारी इमाने इतबारे शासकीय सेवा, तसेच निवडणुकीचे वेळोवेळी काम करीत असतात. भारताची  लोकशाही जतन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या चित्रपट अभिनेत्याची  निवडणूक आयोगाने कोणत्या निकषाच्या आधारे नेमणूक केली? हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु हा अभिनेता व डॉ. तुषार निकाळजे यांचे शैक्षणिक, संशोधनात्मक, नागरी सेवक कर्तव्य यांचा तौलनिक अभ्यास केल्यास पुढील बाबीं निदर्शनास येतील. 

१) भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडलेल्या चित्रपट अभिनेत्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. तसेच त्याने दोन वर्षापर्यंत अभिनयाचा कोर्स केला आहे व त्या आधारे तो चित्रपटात काम करीत आहे. त्याने एका चित्रपटामध्ये मतदान अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. डॉ. निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र येथून ३२  वर्षे कर्मचारी म्हणून काम करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी नोकरी करत असताना एम. फिल, पीएच.डी.सारखे संशोधन पूर्ण केले आहे. 

२) राष्ट्रीय आयकॉन असलेल्या चित्रपट अभिनेत्याने निवडणूक या विषयावर कोणतेही संशोधन केलेले नाही अथवा लेख, पुस्तके, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कार्यशाळा- कॉन्फरन्स यामध्ये निवडणूक या विषयावर लिखाण अथवा सादरीकरण केलेले नाही. परंतु डॉ. तुषार निकाळजे यांनी निवडणूक या विषयावर पीएच.डी.पूर्ण केली आहे. ते वर्ष 2006 पासून आज पर्यंत निवडणूक, प्रशासन, नागरी सेवा या विषयांवर अभ्यास व संशोधन करीत आहे. 

३) या अभिनेत्याने आजपर्यंत निवडणूक या विषयावर एखादा लेख, एखादे पुस्तक, एखादा रिसर्च पेपर सादर केलेला नाही. डॉ. तुषार निकाळजे यांनी आजपर्यंत 12 पुस्तके लिहिली  आहेत. यापैकी निवडणूक या विषयावरील दोन पुस्तके सात विद्यापीठे व दोन स्वायत्त महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत. डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत 78 लेख लिहिले आहेत. यामध्ये  निवडणूक विषयावरील दहा लेखांचा समावेश आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये निवडणूक या विषयावरील पाच रिसर्च पेपर सादर केले आहेत. 

४) आयकॉन असलेल्या अभिनेत्याने पोस्ट डॉक्टरल  रिसर्च केलेले नाही. डॉ. निकाळजे यांनी निवडणूक विषयावरील पोस्ट डॉक्टरल रिसर्च करिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे मागणी केली असता, त्यांना अडवणूक करण्यात आली. मा. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने विद्यापीठास डॉ. निकाळजे यांचा पोस्ट डॉक्टरल रिसर्चचा प्रवेश अर्ज विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (नवी दिल्ली) पाठविण्याचे आदेश दिले. वर्ष 2014 व वर्ष 2016 मध्ये अर्ज पाठवून देखील आजपर्यंत विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी डॉ. निकाळजे यांच्या निवडणूक विषयावरील पोस्ट डॉक्टरल रिसर्च प्रवेश मंजूर किंवा नामंजूर कळविले नाही. 

५) आयकॉन असलेल्या अभिनेत्याने निवडणुकीसंदर्भात कोणत्याही सुधारणा सुचविलेल्या नाहीत.  परंतु डॉ. निकाळजे यांनी निवडणूक आयोगास चार सुधारणा सुचविलेल्या आहेत. या सुधारणांमुळे भारतातील 48 लाख 60 हजार निवडणूक कर्मचारी व 11 लाख मतदान केंद्रावरील प्रत्येकाचा एक तास 50 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या सुधारणा निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने याचे कौतुक केले आहे व भविष्यात अमलात आणण्याचे आश्वासन दिले आहे. 

६) हा आयकॉन अभिनेता नागरी सेवक नाही. निवडणुकीचे कामासाठी नागरी सेवकाची नियमात तरतूद आहे. या अभिनेत्याने आजपर्यंत प्रत्यक्ष निवडणुकीचे काम केलेले नाही. डॉ. निकाळजे हे शासकीय सेवक म्हणून काम करीत होते. त्यांनी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांचे प्रत्यक्षपणे काम केलेले आहे. 

७) वर्ष २००९  मध्ये स्वाईन फ्लूची साथ चालू असताना डॉ. निकाळजे यांनी निवडणुकीचे काम केले आहे. परंतु या आयकॉन अभिनेत्याने त्यावेळी काम केलेले नाही. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी मुसळधार पाऊस चालू असताना डॉ. निकाळजे यांच्यासारख्या बऱ्याच कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम केले आहे. 

८) या अभिनेत्यास कोणतेही शैक्षणिक व संशोधनात्मक पुरस्कार मिळालेले नाहीत. डॉ. निकाळजे यांना आजपर्यंत संशोधनात्मक व शैक्षणिक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  असे एकूण १६ पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये गिनीज बुक रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी, लंडन, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड,  शारजा इत्यादींचा समावेश आहे. 

९) या अभिनेत्याने ज्या चित्रपटात निवडणूक कर्मचाऱ्याची भूमिका केली आहे, त्या चित्रपटाचे मानधन रुपये एक कोटी घेतले आहे. डॉ. निकाळजे  यांना  निवडणुकीचे काम करीत असताना प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सलग ४८  तास कामाचे रुपये ८५०  मानधन मिळाले आहे ( यामध्ये चहा,  नाश्ता, जेवण स्वखर्चाने केले आहे ) 

१०) या अभिनेत्याची निवडणूक विषय मुलाखत घेतल्यास पुढील गोष्टी माहित असतील का? भारतातील एकूण मतदार संघ किती?,मॉक पोल कशाला म्हणतात, दिनेश गोस्वामी, जगन्नाथराव समिती, एनटी रामाराव इत्यादी समितीने निवडणुकीतील कोणते बदल घडवून आणले? आक्षेपीत मतदानाचे डिपॉझिट शुल्क किती असते,  १७ सी म्हणजे काय,पट्टी सिल,  ट्याग, भारतातील मतदार संख्या किती, मतदान केंद्रे किती, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या किती इत्यादी.

११) या अभिनेत्याला ज्या चित्रपटात मतदान अधिकारी म्हणून काम करताना दाखवले आहे. त्या चित्रपटात हा अभिनेता सकाळी पाच वाजता अंडी खाताना दाखविला आहे. डॉ. निकाळजे यांनी आजपर्यंत निवडणुकीचे काम केले आहे. परंतु कर्मचाऱ्यांना जेवण तर सोडाच परंतु चहाचा कप देखील मिळाल्याचे ऐकिवात  नाही. 

१२) या अभिनेत्याला ज्या चित्रपटाच्या अनुषंगाने निवडणूक आयकॉन म्हणून निवडले आहे, त्या चित्रपटात मतदान प्रक्रियेतील विरोधाभास दाखविला आहे.  मतदान केंद्रात कर्मचारी पत्ते खेळताना दाखविले आहेत. 

१३) आयकॉन अभिनेत्याने निवडणुकीचे प्रत्यक्ष काम केलेले नाही. डॉ. निकाळजे व त्यांच्या पत्नीने निवडणुकीच्या कामाकरिता ड्युटी लागली असताना स्वतःच्या मुलास तीन दिवस शेजाऱ्याकडे ठेवून काम केले आहे. असे एकदा नव्हे किमान १४  वेळा असे घडले आहे. अशाप्रकारे बऱ्याच महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. 

१४) आता या आयकॉन अभिनेत्यास मोफत राहणे, मोफत विमान प्रवास इत्यादी सुविधा मिळतील. परंतु डॉ. निकाळजे यांनी निवडणूक विषयातील  पुस्तके लिहून, संशोधन करून देखील एखादी वेतन वाढ, विशेष पदोन्नती किंवा संशोधनासाठी आर्थिक सहाय्य ते काम करीत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व महाराष्ट्र शासनाने दिलेले नाही. उलट डॉ. निकाळजे यांच्या निवडणूक विषयक संशोधनाचा उपयोग नसल्याचे कळविले आहे. डॉ. निकाळजे यांची एक वर्ष दहा दिवसांची स्टडी लिव्ह विनावेतनी करण्यात आली आहे. 

१५) निवडणूक आयकॉन हिरो यांनी शासकीय नोकरी केली नसल्याने त्यांना ओव्हरटाईमचे पैसे अथवा विनावेतन रजा याबद्दल माहिती नसतील. डॉ. निकाळजे यांनी ३२  वर्षे सेवेतील १८ वर्ष कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ओव्हर टाईम काम करून देखील कधीही ओव्हरटाईमचे आर्थिक मागणी केली नाही. सेवानिवृत्तीच्या वेळी चार वर्षांपूर्वी पंधरा दिवस दहा ते पंधरा मिनिटे उशिरा कार्यालयात आल्यामुळे बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे पंधरा दिवसांची रजा वजावट करण्यात आली. विद्यापीठातील परीक्षा विभागात काम करीत असल्याने कोविडच्या कालावधीत कार्यालयात रात्री  एक वाजेपर्यंत काम करूनही ही अवस्था. 

१६) या अभिनेत्याला ज्या चित्रपटात मतदान कर्मचारी म्हणून काम केले आहे, त्या आधारे आयकॉन म्हणून नेमले असल्यास त्या चित्रपटाची काही पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे....या चित्रपटामध्ये महिला मतदान अधिकारी मतदान केंद्र सोडून झाडाखाली डबा खाताना, मतदानाची वेळ सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत दाखविली आहे, मतदान केंद्र असलेल्या शाळेला दरवाजा अथवा खिडक्या नाहीत, वास्तविक अशी परिस्थिती नसते. या चित्रपटात मतदान केंद्रावरील सुरक्षा अधिकारी झोपलेला दाखविला आहे, चित्रपटांमध्ये मतदार मतदान करत नसतील तर सुरक्षा अधिकारी मतदान करतील असा आशय दाखविझला आहे, निवडणूक अधिकारी मतदान साहित्य घेऊन आठ किलोमीटर पर्यंत चालत येताना दाखविले आहेत, हे चुकीचे आहे. सुरक्षा अधिकारी मतदान अधिकाऱ्यांना दमदाटी करताना दाखविले आहेत, जंगलामध्ये सर्वांसमक्ष मतदान करताना दाखविले आहे, मतदान केंद्रात भिंतीवर मजकूर लिहिलेला आढळतो, मतदान केंद्राच्या आसपास भयावह परिस्थिती दाखविली आहे. अशा बऱ्याचशा विरोधाभास दर्शविणाऱ्या गोष्टीचे चित्र या चित्रपटात दाखविले  आहे आणि या चित्रपटाच्या आधारे या चित्रपटातील अभिनेत्यास निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन म्हणून नेमणूक करीत असतील तर मग यास काय म्हणावे? 

१७) चित्रपटांमध्ये काम करावयाचे म्हणजे त्या व्यक्तीस पुढील काही गोष्टी माहित असणे अपेक्षित आहे. उदा.:- स्क्रीन टेस्ट, ऑडिशन, डायलॉग, रिडींग, वाचन,  हावभाव, नौरस (व्हेरिएशन्स ऑफ अॅक्टींग) , लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन, स्क्रिप्ट लिहिणे, लोकेशन, टीम गोळा करणे, काम वाटून देणे, रियलसर, सेट, एडिटिंग, सेन्सर, संस्था नोंदणी, रायटर असोसिएशन इत्यादी. हे शिकण्यासाठीच फिल्म इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे चित्रपटाच्या संबंधित शिक्षण व संशोधन दिले जाते. कारण चित्रपट निर्मितीमध्ये या सर्व गोष्टींचे ज्ञान महत्त्वाचे ठरते. चित्रपट हा समाजाचा आरसा समजला जातो. 

            तसेच निवडणूक- मतदान यांचे पदाधिकारी पद मिळण्यासाठी किंवा त्या कामावर नियुक्ती करण्यासाठी निवडणुकीच्या नियम व कार्यपद्धती विषयी माहिती असणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीला निवडणूक व मतदान प्रक्रिया यांबाबत किमान पुढील काही गोष्टी माहिती असणे अपेक्षित आहे. उदा:-  लघु निरीक्षक, किती वेळाने मतदान आकडेवारी लिहायची, लोकप्रतिनित्व कायदा, परिसिमन  आयोग, श्रीमती रमादेवी यांची १९९२ साली निवडणूक आयुक्त पदाची अपात्रता, फॉर्म १७ सी, पट्टी सील, टॅग, बॅलेट बॉक्स, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट, झोनल ऑफिसर, केंद्राध्यक्षांची डायरी, तसेच मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे ६८  प्रकारचे इतर साहित्य, २८  प्रकारचे फॉर्म व वस्तू इत्यादी. निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन म्हणजे त्यास इतर देशांमधील अथवा राज्यांमधील निवडणुकी संदर्भात थोडीशी माहिती असणे अपेक्षित आहे. सध्या नेमलेल्या व अभिनेता असलेल्या राष्ट्रीय आयकॉनला पुढील काही गोष्टी माहित आहेत का? अमेरिकेमध्ये 1775 मध्ये फक्त धनाढ्य लोक मतदान करीत होते, सूझन बी अँधोनी या महिलेने 1869 मध्ये महिलांना प्रथम मताधिकार मिळवून दिला, जॉर्जिया देशातील हेलसिंकी निवडणूक समिती, फ्रान्समधील 18 जून 1997 चे निवडणूक धोरण , दक्षिण आफ्रिकेतील प्राध्यापक अरेंडलेज फोर्ट यांचे विचार , जपानमधील होमाकाव मोरिहिरो निवडणूक सुधारणा समिती, कॅनडामधील पैर एफ कोट निवडणूक सुधारणा समिती, ऑस्ट्रेलियातील जूद विरोधी मेकन निवडणूक प्रकरण, इंडोनेशियामध्ये भावी लोकसभा निवडणुकीसंदर्भात झालेली बैठक, भारताचे माझी दिवंगत निवडणूक आयुक्त एम. एस. गिल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व दोन निवडणूक  निवडणूक आयुक्तांना समान अधिकारासाठी  केलेले प्रयत्न, राजस्थानमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ११ निवडणूक अधिकाऱ्यांचे झालेले निधन, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मतदानाच्या कामासाठी पहाटे दुचाकीवरून जात असताना एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू, महाराष्ट्रातील पुणे शहराततील ताडीवाला रोड येथे मतदान अधिकारी म्हणून काम करीत असलेल्या महिलेला खांदे-कंबर- गुडघे आखडल्यामुळे खुर्चीसहित उचलून दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याची घटना, गुजरात मधील गिर जंगलात एका मतदारासाठी उभारलेले मतदान केंद्र, NOTA इत्यादी. 

         आता यापुढे लोकशाही, सुशासन, निवडणुका या विषयांवर संशोधन करणारे संशोधक कदाचित चित्रपट विषयांकडे वळतील असे वाटते. ज्यांनी खस्ता खाल्ल्या, घाम गाळला, रक्त आटवले ते बाजूलाच राहिले. परंतु परदेशी बनावटीच्या गाडीत फिरणारे, सुसज्ज बंगल्याच्या एअरकंडीशन खोलांमध्ये व  व्हॅनिटी व्हॅन मध्ये राहणाऱ्या अभिनेत्यांना निवडणूक राष्ट्रीय आयकॉन करणे किती योग्य? सलग दोन दिवस बिना पंख्याच्या व ४१ , ३९ अंश  तापमान असलेल्या खोलीत मतदानाचे काम या आयकॉन अभिनेत्यास करता येईल का ?दिवंगत टी.एन.शेषन यांनी निवडणूक आयोगाचे महत्त्व सगळ्या जगाला दाखवून दिले. आता असे टी.एन.शेषन लाभणे मोठ्या मुश्किलचे  काम झाले आहे. वरील सर्व माहिती आयकॉन अभिनेत्यास असेल किंवा नाही यापेक्षा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना किंवा समित्यांना तरी ही माहिती आहे किंवा नाही?  हा एक प्रश्नच आहे. केवळ काही सम कक्ष प्रशासकीय कामाचा पाच वर्षाचा अनुभव किंवा पात्रता असलेल्यांना अधिकारी पदावर पदोन्नती किंवा नेमणूक केली  गेली असेल तर. .......? 

       डॉ. निकाळजे यांच्यासारखे भारतामध्ये हजारो संशोधक असतील, लाखो कर्मचारी असतील ज्यांना निवडणूक आयोगाने का डावलले? याबाबत माहिती मिळू शकेल का किंवा या सर्वाचा असा निष्कर्ष निघू शकेल का? निवडणूक आयोगाला अभ्यासक- संशोधकांची एक प्रकारे ॲलर्जी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post