विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत दुष्काळ निवारण कार्यशाळेचे आयोजन

दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे  : कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 

महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळ निवारण अंमलबजावणीबाबत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 

यावेळी महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समितीचे (एमडीआरएसपी) शिरीष कुलकर्णी व स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक, गौतम गालफाडे, झेलम जोशी, राज्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भुजलातील कमतरता आदी निकष लक्षात घेऊन १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यात गंभीर तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात कमी पाऊस, सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागात सामाजिक संस्था दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत. 

त्या पुढे म्हणाल्या, दुष्काळात पिण्याचे पाणी, चारा टंचाई, बेरोजगारी इत्यादी परिस्थितीला सामोरे जावे लागते. बेरोजगारीमुळे वंचित घटक, आदिवासी, शेतमजूर आदी घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. याची सर्वाधिक झळ महिला, जेष्ठ व्यक्ती, मुलांना बसते. त्यांचे स्थलांतर रोखून त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळवून देणे, त्यासाठी त्यांना जॉब कार्ड मिळवून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या वीजबिलात सुट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर होतो का आदींची माहिती संस्थानी निर्दशनास आणावी. दुष्काळ निवारणाच्या कामात स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय ठेवून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात याव्यात. संस्थानी सक्षम होऊन चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करावे. कामे करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात यावे. दुष्काळाच्या परिस्थितीतही शाश्वत विकास कसा राहील, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

यावेळी श्री.  कुलकर्णी आणि श्रीमती पाठक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.  तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळाची परिस्थिती सांगितली.

Post a Comment

Previous Post Next Post