भारताचे संविधान जगातील अनेक देशांना मार्गदर्शक- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संविधानाच्या सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह धावले पुणेकर


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान हे जगातील अनेक नवनिर्मित देशांना आपल्या संविधान निर्मितीमध्ये मार्गदर्शक ठरले आहे. संविधान दिन साजरा करण्याबरोबरच संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे अधिक महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

संविधान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित 'संविधान सन्मान दौड २०२३' ला मंत्री श्री. पाटील आणि कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष व स्पर्धेचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारले याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित करण्यासह विविध कार्यक्रमाद्वारे सर्व देशभर हा दिवस साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. संविधानाच्या माध्यमातून भारताची लोकशाही सदृढ करण्याचे काम त्यांनी केले. हजारो वर्षे बदलावेच लागणार नाही असे परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

स्पर्धेत सहभागी नागरिकांचे अभिनंदन करून, सदृढ आणि सक्षम समाजासाठी खेळ महत्वाचे आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

या 'संविधान सन्मान दौड' मध्ये तब्बल ३१ देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

दरम्यान,  या स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी  'वॉक फॉर संविधान' रॅली काढली होती. या उपक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली.  विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आणि  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले. 

Post a Comment

Previous Post Next Post