ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना दि. २५ एप्रिल रोजी ‘स्वरप्रतिभा कोहिनूर’ पुरस्कार

मा. दीनानाथ यांच्या दुर्मिळ रेकॉर्ड्स ऐकण्याची संधी 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या २४ एप्रिल या पुण्यतिथी दिनानिमित्त मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी लेडी रमाबाई हॉल, स.प. महाविद्यालय, पुणे येथे सायं. ५:०० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या निवडक ध्वनीमुद्रिकांवर आधारित ‘मा. दीनानाथ मंगेशकर जीवन आणि संगीत - वसा आणि वारसा’ श्राव्य कार्यक्रम आणि ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका सौ. आशा खाडिलकर यांना ‘स्वरप्रतिभा कोहिनूर पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


 ११,००० रु. रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ सिने-संगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून ध्वनीमुद्रिका संग्राहक व संगीत रंगभूमीचे अभ्यासक राजेंद्र ठाकूरदेसाई आणि पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांच्या प्रार्थनेनी कार्यक्रमास प्रारंभ होईल. नीलिमा बोरवणकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील अशी माहिती ‘स्वरप्रतिभा’ या संगीताला समर्पित दिवाळी अंकाचे संपादक व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितली. 


‘स्वरप्रतिभा’ हा संगीताला समर्पित दिवाळी अंक यंदा २०वे वर्ष सादर करीत असून त्यानिमित्त हा पुरस्कार देत आहोत असे सांगून प्रवीण प्र. वाळिंबे म्हणाले की, या कार्यक्रमात मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या दुर्मिळ, निवडक रेकॉर्ड्सवर आधारित ‘मा. दीनानाथ मंगेशकर जीवन आणि संगीत - वसा आणि वारसा’ हा श्राव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मराठी संगीत रंगभूमी वरील देखणे गायक नट, शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत यावर प्रभुत्व असलेले कल्पक प्रयोगशील संगीततज्ञ म्हणून मा. दीनानाथ यांच्यी कारकीर्द अल्पायुषी ठरली. तरीही त्यांच्या संगीताचा वारसा त्यांच्या पंचप्राण असलेल्या मुली व मुलाने अवघ्या विश्वात नेला. 


या श्राव्य कार्यक्रमात  मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे जीवन, त्यांची गाजलेली नाटके आणि मूळ ध्वनीमुद्रित नाट्यगीते ऐकवली जाणार आहेत. त्यांचे सुपुत्र पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचना,  लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायलेली गाणी असा सर्व मंगेशकरी संगीताचा हा श्राव्य कार्यक्रम आहे. मानापमान रणदुंदुभी,  भाव बंधन पुण्यप्रभाव  इत्यादी नाटकातील पदे  रसिकांना ऐकवली जातील.

सुलभा तेरणीकर व राजेंद्र ठाकूर देसाई निवेदनासह हा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे असे प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले. 


प्रवीण प्र. वाळिंबे 

माध्यम समन्वयक 

९८२२०४५४२३४ 

७३८७००२०९७

Post a Comment

Previous Post Next Post