गोहत्या थांबवा म्हटल्याने युवकावर जीवघेणा हल्ला, साळोख येथील घटना,

 नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेरळ पोलीस ठाणे देखील रक्ताळले 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

        नेरळ ममदापुर भागात नुकतेच गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे तत्सम भाग नाल्यात टाकत असल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण ताजे असताना शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री कर्जत तालुक्यातील एका युवकावर ८ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या तरुणाने गावात गोहत्या करू नये याविषयी प्रबोधन केले होते. काही जणांना हे रुचले नसल्याने या तरुणावर त्यांनी राग काढला. दरम्यान या तरुणावर हल्ला झाल्यानंतर त्याने थेट नेरळ पोलीस ठाणे गाठल्याने नेरळ पोलीस ठाणे देखील रक्ताळले होते. तर नेरळ पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. 

           



   याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील साळोख गावातील जरार ताहीर सैरे वय २५ हा तरुण उच्चशिक्षित असून शेलू येथील महाविद्यालयात शिक्षक म्हणून विद्यादानाचे काम करीत आहे. तर जरार ताहीर सैरे याने गावात गोहत्या बंदी बाबत प्रबोधन केले होते. तसेच गोवंश हत्या होऊ नये याकरिता आरोपी अकील बुबेरे याच्याशी जरार बोलला होता. या गोष्टीचा राग येऊन आरोपी अकील मुश्ताक बुबेरे, जाकीर मुश्ताक बुबेरे, शगफ शकील बुबेरे, अरसलान शकील बुबेरे, शोएब शकील बुबेरे, शाकिब मुस्ताक बुबेरे, फरहान फारुख बुबेरे, शकील मुस्ताक बुबेरे यांनी जरारला धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्यानुसार रमजानचा महिना असल्याने दिवसभर रोजा ठेवलेल्या जरार सैरे हा रोजा सोडून साळोख गावातील मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी यांनी मशिदी बाहेर जरारला बोलावून घेऊन त्यावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात जरार जब्बर जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेला जरार याला नेरळ पोलीस ठाण्यात तसेच दुचाकीवरून घेऊन येण्यात आले. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यात देखील रक्ताचा सडा पडला होता. तर येथे आल्यानंतर नेरळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे यांनी जखमी जरारला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर जखमीची परिस्थिती नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी एमजीएम रुग्णालय कामोठे येथे घेऊन जाण्यास सांगितले. 

                दरम्यान दुसऱ्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकरी कर्जत विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तर आरोपींवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ९३/२०२३ भादंवि कलम ३०७,१४३,१४४,१४७,१४८,१४९,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे पुढील तपास करीत आहे

Post a Comment

Previous Post Next Post