कै. विजयाताई लवाटे यांचे कार्य दिव्यत्व आणि देवत्व दर्शविते -पद्मश्री गिरीश प्रभुणे १२ फेब्रुवारी २०२३


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कर्म योगिनी विजयाताई लवाटे यांनी एड्स संसर्गित मुलांसाठी केलेले काम हे दीपस्तंभासारखे असून ते पुढे नेण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक संचालक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. मानव्य संस्थेचा कर्मयोगीनी कै. विजयाताई लवाटे पुरस्कार त्यांच्या १८व्या स्मृतीदिनी प्रयास संस्थेला श्री प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे होते.

प्रयास संस्थेचे संस्थापक डॉ. विनय कुलकर्णी आणि संजीवनी कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, रोख रक्कम आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्वस्त उज्वला लवाटे, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे, मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे, विश्वस्त व निवेदिका विनया देसाई व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात श्री दत्तात्रय काटे, डॉ. अश्विनी देशपांडे, अनिता मदने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रभुणे यांनी सांगितले की, विजया ताईंचे जीवन संघर्षमय होते. एका अर्थाने ते आदर्शव्रत असेच आहे. मुळात मानव्य संस्थेचे कार्य हे दिव्यत्व आणि देवत्व दर्शविणारे आहे. जगण्यातला आनंद आणि आनंदाचे जगणे याची शिकवण त्यांनी एड्स संसर्गित मुलांना दिली. त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी युवकांनी या क्षेत्रात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुरस्कार स्वीकारल्या नंतर उत्तर देताना प्रयास संस्थेचे डॉ.कुलकर्णी म्हणाले की, मानव्य संस्थेने एड्स संसर्गित मुलांसाठी घर निर्माण केले तर प्रयास संस्थेने अशा मुलांसाठी क्लिनिक, ग्रंथालय सुरु केले आहे. त्याचप्रमाणे संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. जीवनाकडे आनंदाने पाहण्याचा दृष्टिकोन देण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. खर तर सध्याच्या काळात मानवतेची आवश्यकता आहे. मानव्य आणि प्रयास संस्था एकत्रपणे नेमके हेच काम करीत आहे. आजच्या पुरस्कारामुळे संस्थेच्या पुढील कार्याला नक्कीच प्रेरणा अधिक मिळेल असेही त्यांनी सांगितले.

संजीवनी कुलकर्णी यांनी मनोगतात पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आणि संस्थेच्या दृष्टीने आनंददायी क्षण असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या विविध प्रकल्प आणि योजना याबाबत माहिती सांगितली.

श्रीराम रानडे यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना विजयाताई यांच्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली. मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी सांगितले की, संस्थेतील एड्स संसर्गित मुलांना जीवनाकडे सकारात्मकतेने, आनंदाने पाहण्याचा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मुलांना रोजगाराची संधी निर्माण करुन दिली आहे. तसेच अन्य संस्थांमध्ये कशा प्रकारे काम चालते ते शिकण्यासाठी, अनुभवण्यासाठी विशेष भेटीचे आयोजन, विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबत माहिती प्रत्यक्ष दिली. यांचा त्यांना नक्कीच उपयोग होतो आहे.सुरुवातीला साक्षी केदारीने गणेश वंदना नृत्याच्या सादरीकरणातून सादर केली.विनया देसाई यांनी आभार मानले आणि सूत्र संचालन केले

कार्यक्रमाला मानव्य आणि प्रयास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.



फोटो ओळ- डावीकडून विश्वस्त उज्वला लवाटे, संजीवनी कुलकर्णी, विनय कुलकर्णी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, रंगकर्मी श्रीराम रानडे, मानव्यचे अध्यक्ष शिरीष लवाटे.




Post a Comment

Previous Post Next Post