पुणे, खडकीसह देशातील ५७ कॅन्टाेन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, खडकीसह देशातील ५७ कॅन्टाेन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले.या  कँटोन्मेंट बोर्डांच्या सर्वसाधारण निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार असल्याची अधिसूचना शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव राकेश मित्तल यांनी जारी केली.

देशात एकूण ६२ कॅन्टाेन्मेंट बाेर्ड आहेत. त्यापैकी पुणे, खडकीसह ५७ कॅन्टाेन्मेंटचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२०मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने बोर्डाच्या सदस्यांच्या कार्यकाळाला दोनदा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर हे कॅन्टाेन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०२१ रोजी विसर्जित करण्यात आले होते. या बोर्डांची पुनर्रचना करून त्यावर अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व जनतेचा एक नामनिर्देशित प्रतिनिधी अशी त्रिसदस्यीय प्रशासक समिती नेमण्यात आली होती. नुकतीच या प्रशासक समितीला आणखी सहा महिने किंवा निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकांचे बिगुल वाजल्याने कँटोन्मेंट बोर्डांवरील प्रशासक राज संपणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 देहू राेड कॅन्टाेन्मेंटचा समावेश नाही

पुणे, खडकी, नगर, औरंगाबाद, नाशिकमधील देवळाली आणि नागपूरमधील कामठीसह देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डांमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांच्या निवडीसाठी या निवडणुका होणार आहेत. याबाबत संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत देहू रोड कँटोन्मेंटचा समावेश नाही. त्यामुळे तेथील निवडणुकांबाबत अद्याप स्पष्टता नाही.

'कॅन्टाेन्मेंट'चे पालिका क्षेत्रात विलिनीकरण हवेतच!

सहा महिन्यांपूर्वी देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांचे नजीकच्या महापालिकेत विलिनीकरण करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाचा आदेश आला हाेता. त्यामुळे महापालिका क्षेत्रात मिळणाऱ्या सर्व सुविधा कॅन्टोन्मेंटवासीयांनाही मिळतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, त्यासंदर्भात केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यातील कागदाेपत्री कार्यवाहीदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका अचानक घाेषित केल्यामुळे येथील स्थानिक नागरिकही चक्रावून गेले आहेत.

संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डांमध्ये ३० एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. कँटोन्मेंट कायद्याच्या नियमावलीनुसार या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पुढील प्रक्रियेबाबतच्या सूचना अद्याप आलेल्या नाहीत.

- रॉबिन बालेजा, मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कँटोन्मेंट बोर्ड

Post a Comment

Previous Post Next Post