बाईक टॅक्‍सी विरोधात आजपासून रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारला

 रिक्षाच्या संपाचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे.त्यामुळे पालक चिंतेत 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : बाईक टॅक्‍सी विरोधात आजपासून रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. रिक्षा संपामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सहभागी होणार आहेत. त्यामुळे रिक्षाच्या संपाचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे.त्यामुळे पालक चिंतेत आहे. पालकांसमोर मुलांना शाळेत कसे पाठवायचे, याची चिंता सतावत आहे. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे.

शहरात दुचाकीच्या माध्यमातून अनधिकृतरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्‍सीविरोधात रिक्षा संघटनांनी आजपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बेमुदत संपाची घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एक लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक आहेत. यातील 30 ते 40 टक्‍के रिक्षा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. आजपासून सुरू होणाऱ्या संपात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सहभागी होणार असल्याची माहिती रिक्षा संघटनांनी दिली आहे. शालेय वाहतूक करणाऱ्या बसपेक्षा रिक्षा स्वस्त असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. पण, रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचे प्रचंड हाल होणार आहेत. रुग्ण, वृद्ध, चाकरमान्यांना रिक्षा बंदचा फटका बसणार आहे.रिक्षा संघटनांनी बंदची घोषणा केली आहे. पण, शालेय विद्यार्थ्यांना का वेठीस धरले जात आहेत. पोलीस आणि आरटीओने हा संप मोडीत काढला पाहिजे. विद्यार्थी आणि पालकांना दिलासा दिला पाहिजे.

-बाळू लगड, पालक

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. आम्हाला पण चांगले वाटत नाही. पण, रिक्षा संघटनांनी निर्णय घेतला असल्यामुळे नाईलाजास्तव आम्ही सहभागी होत आहेत.

– रवी ठाकूर, रिक्षाचालक

ज्याच्यावर गुन्हा दाखल केला तो रॅपिडोचा मालक नसून तो प्रभात रोडच्या ऑफिसमधला शिपाई आहे. आरओची कारवाई ही धूळफेक करणारी आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत.

– डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना

गेली दोन वर्षे आम्ही पाठपुरवठा करीत आहे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिली आहेत. पण, अजूनही कारवाई होत नाही. त्यामुळे रिक्षा ऍपवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आंदोलन करणार आहेत.

– किशोर चिंतामणी, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिक्षा युनिट

शहरातील अवैध प्रवाशी वाहतूक बंद करावी. आरटीओला ऍप बंद करण्याची सर्व प्रक्रिया माहिती असताना ते केवळ एका शिवायावर गुन्हा दाखल करतात. यात कोणाचे आर्थिक हितसंबध तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

– संजय कवडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा वाहतूक संघटना.

Post a Comment

Previous Post Next Post