राज्यशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांच्या प्रशासकांना दिले

प्रेस मीडिया लाईव्ह :

पूणे महापालिकेच्या प्रभाग रचना आणि निवडणुका संदर्भातील दावे न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्यशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांच्या प्रशासकांना दिले आहेत.

त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली असून जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान निवडणुका होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नजीकच्या लोकसंख्येच्या आधार घेत प्रभागांची लोकसंख्या आणि प्रभागांची संख्या निश्‍चित करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्य संख्येच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, शासनाच्या आदेशात याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने महापालिका प्रशासन संभ्रमात आहे. मात्र, या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार असून निवडणुकांची प्रतीक्षा संपणार आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांनी याबाबत आदेश काढले असून त्यात, शासनाने 11 मार्च 2022 आणि 9 ऑगस्ट 2022 मध्ये निवडणूक अधिनियमात केलेल्या सुधारणांचा संदर्भ देण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षण सुनावणी न्यायालयात सुरू असल्याने तत्कालीन आघाडी सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे निवडणुका घेण्याचे तसेच प्रभाग रचनेचे अधिकार कमी करून शासनाकडे घेतले होते. तसेच, लोकसंख्या वाढ गृहीत धरून सदस्य संख्या वाढविली होती. तर त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून आघाडी सरकारने वाढविलेली सदस्य संख्या निर्णय रद्द केला होता. तसेच प्रचलित पद्धतीने प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 2017 प्रमाणेच मुंबई वगळता इतर महापालिकामध्ये 4 सदस्यांच्या प्रभागात निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.Post a Comment

Previous Post Next Post