भाविकांच्या सुरक्षेसाठी वारी कालावधीत पालखी मार्गावर, पंढरपूर शहरात वाहतूक आराखडा करावा

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या सूचना


 प्रेस मीडिया लाईव्ह :

 पंढरपूर, दि.30 (उमाका):- पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात तसेच पंढरपूर शहरात  यात्रा कालावधीत वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात असते. वारकऱ्यांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात वाहतूक आराखडा तयार करावा अशा, सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती  व नगरपालिका प्रशासनाकडून  करण्यात येणाऱ्या कामाबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती  येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपसभापती गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. बैठकीस मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, संभाजी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. विशेषत: आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. पंढरपूरात येणाऱ्या वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच सुरक्षा व सुरक्षिततेचा अंदाज घेण्यासाठी दिड्यांची  व त्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्याची संख्या नोंद करावी.  तसेच मंदीर व मंदीर परिसरात मंदीर समितीकडून  येणाऱ्या  कामांची व इतर सुधारणांची माहिती मंदीर समितीच्या वेबसाईटवर उपलब्ध करावी. तसेच त्यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास महाराज मंडळी, वारकरी व नागरिकांच्या सूचना घ्याव्यात. तसेच पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मंदीर व इतर ठिकाणी पेस्ट कंट्रोल करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यमाई तलाव व परिसराची सुधारणा करण्यासाठी नगरपालिकेने आराखडा तयार करावा. सुशोभिकरणासाठी स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी यांच्याकडून सूचना घेऊन तत्काळ प्रस्ताव सादर करावा. तसेच पालखी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे. पालखी सोहळ्यासोबत दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात  वारकरी भाविकांची संख्या वाढत असल्याने  पालखी मुक्कामाच्या ठिकाणी  अधिकची शासकीय जागा आरक्षित करुन सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या वारकरी भाविकांना वारकरी -भाविकांना आवश्यक  सोयी सुविधा उपलब्ध केल्या तसेच आषाढी वारी निर्विघ्नरित्या पार पाडल्याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे  कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, स्कायवॉक, परिवर देवता आणि मंदिरातील डागडुजी याविषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी श्रीमती गोऱ्हे यांना दिली.


Post a Comment

Previous Post Next Post