सातारा : राजकीय हालचाली आता जोर धरू लागली आहे



प्रेस मीडिया लाईव्ह :

 सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व एक नगरपंचायत अशा नऊ संस्थांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्‍चित झाल्यानंतर शहरातील राजकीय हालचाली आता जोर धरू लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीकडून राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या बांधणीचा पहिला टप्पा म्हणजे खासदार उदयनराजे यांनी हद्दवाढीतील या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेत नागरिकांची कामे झाली पाहिजेत असे निर्देश दिले. दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजे यांनी जनता दरबार गतिमान केला असून सातारा शहर व हद्दवाढीच्या प्रश्‍नांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. याशिवाय नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याचे  प्रयत्न सुरू झाले आहेत.

सातारा पालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सातारकरांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला सत्ता बहाल केली होती. त्यावेळी सातारा विकास आघाडीचे 22, नगर विकास आघाडीचे 12 आणि भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर येथील राजकारणाला नवीन परिमाण मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर आरक्षण आणि मतदारयादी निश्‍चिती असा कार्यक्रम पुढील दोन महिन्यांच्या टप्प्यात नियोजित केला आहे. या घडामोडींचा अंदाज घेऊन उदयनराजे यांनी हद्दवाढीतील क्षेत्रांमध्ये 25 कोटी रुपये निधी वितरणाचा आराखडा तयार केला आहे.

त्या कामांचा आढावा घेणारी बैठक यांनी बुधवारी जलमंदिरात घेऊन जास्तीत जास्त सुविधा नागरिकांना लवकर कशा मिळतील याकरिता प्रशासनाकडे आग्रह धरला आहे. शिवाय इलेक्‍टिव्ह मेरिट आणि विकासकामांमुळे नागरिकांशी संवाद साधणारा लोकप्रिय चेहरा याचीसुद्धा शॉर्टलिस्ट बनवण्याचे काम सुरू झाले आहे. अर्थात मिळालेल्या माहितीनुसार हा सातारा विकास आघाडीच्या राजकीय रणनीतीचा गोपनीय अजेंडा आहे. दुसरीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीने विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून दमदार कामगिरी नोंदविणे अपेक्षित होते. शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी राजकीय सख्ख्य ठेवल्याने सातारा व जावळी तालुक्‍यातील कामांना 25 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा केला. नुकत्याच पार पडलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली राजकीय ताकद राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या बाजूने उभी केली होती.

त्यांनी साताऱ्यात नवीन तहसीलदार व प्रांत कार्यालयाच्या प्रस्तावाचा कसोशीने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. नगर विकास आघाडीच्या गटांमध्ये एकसंधपणा जाणवत नसला तरी नव्या चेहऱ्यांसाठी शिवेंद्रसिंहराजे यांचा शोध सुरू आहे. सत्तेच्या राजकारणासाठी नगर विकास आघाडीचे शिलेदार सक्रिय झाले असून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचक हालचाली सुरू आहेत. “सुरुची’वर होणाऱ्या जनता दरबाराच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्वसामान्य सातारकरांचे प्रश्‍न सोडवण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. हद्दवाढीत नवीन आलेल्या शाहूपुरी, शाहूनगर आणि विलासपूर या भागांमध्ये नगर विकास आघाडीने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post