महाराष्ट्रातील दारूच्या दुकानांना देवी-देवतांची आणि महापुरुषांची नावे देण्यावर बंदी.

 विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित , राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून बंदी घातली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्रातील दारूच्या दुकानांना देवी-देवतांची आणि महापुरुषांची नावे देण्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. देवी-देवतांची किंवा महापुरुषांची किंवा ऐतिहासिक किल्ल्यांची नावे असलेल्या अशा दारूच्या दुकानांना नाव बदलण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.राज्यात अनेक ठिकाणी दारू दुकाने, बार यांना देवता किंवा महापुरुषांचे नाव देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. याबाबत काही सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून बंदी घातली आहे.

राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांबाबत तसेच महापुरुषांबाबत प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असल्याचे आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत देवदेवतांची, महापुरुषांची, गडकिल्ल्यांची नावे वापरून दारूची दुकाने, बार सुरू करून या देवतांची, महापुरुषांची, ऐतिहासिक वास्तूंची प्रतिष्ठा पणाला लागते. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक भावनाही दुखावल्या जातात. त्यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते.

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशात राज्यातील गड-किल्ले आणि महापुरुषांसह सर्वांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा राखणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ज्याठिकाणी कोणत्याही प्रकारची दारू विकली जाते, अशा ठिकाणांना कोणत्याही धार्मिक चिन्हे, देवी-देवता, महापुरुष, ऐतिहासिक, प्रतिष्ठित व्यक्तींचे नाव देण्यावर बंदी घालण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post