कु. श्रुती सागर शेवते यांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खोपोली पोलीस ठाण्याचा प्रतिकात्मक स्वरूपात प्रभारी निरीक्षक पदाचा सन्मान प्रदान.




प्रेस मीडिया लाईव्ह :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कु. श्रुती सागर शेवते यांच्या हाती प्रभारी पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे प्रतिकात्मक स्वरूपात सोपवून महिलांचा  सन्मान केला. त्याच सोबत पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छतेची कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती अनिता संतोष करकरे यांचा सन्मान करतांना त्यांना सोबतच्या आसनावर  स्थानापन्न केले. 

खोपोली सारख्या अतिमहत्त्वाच्या पोलिस स्टेशनची जबाबदारी आपल्या खांद्यावर येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी कुमारी श्रुती सागर शेवते हीने प्रतिकात्मक स्वरूपात पदभार सांभाळल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना प्रतिपादन केले. 

खोपोली पोलीस ठाण्याच्या सर्व महिला कर्मचारी वर्गाला पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला कर्मचारी वर्गाचे कौतुक करताना त्यांना रोख रकमेचे बक्षीसही दिले. आपल्या सोबत रात्रंदिवस ड्युटी बजावताना महिला कर्मचारी कार्यक्षमतेत कुठेच कमी पडत नाही ही स्वतःसाठी गर्वाची बाब असल्याचे त्यानी सांगितले.  प्रभारी पोलीस निरीक्षक कु. श्रुती सागर शेवते यांच्या हातून निरंतर देशसेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये ए.पि.आय. हरेश कळशेकर आणि कर्मचाऱ्यां समवेत पत्रकार देखील उपस्थित होते.  या आयोजनात झालेल्या सन्मानाने सर्व महिला कर्मचारी वर्ग आनंदित झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post