पुण्याचे संशोधक डॉ.तुषार निकाळजे यांनी निवडणूक प्रशासकीय कामकाजात सुचविले बदल



प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतामध्ये सध्या ४५  लाख निवडणूक कर्मचारी - अधिकारी, १० लाख ३५ हजार मतदान केंद्रे, ८० कोटी मतदार आहेत. "कोविड-१९(कोरोना) या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल व्हावेत", अशी विनंतीवजा सूचना डॉ.तुषार निकाळजे यांनी एका प्रस्तावाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ,नवी दिल्ली यांना पाठविली  आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. मतदान जागृती बस मॉडेल, मतदान केंद्रांची संख्या वाढविणे ,सहकारी गृहरचना संस्थांच्या क्लब हाऊसचा मतदान केंद्र म्हणून वापर करणे, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत गर्दी न करण्याचे मतदारांना आवाहन, मतदान साहित्य वाटप केंद्रावर मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांना वेळ देणे ,निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रातच जेवण, चहा, पाण्याची निवडणूक आयोगामार्फत व्यवस्था, या खाद्यपदार्थांवर अन्न व भेसळ महामंडळाची देखरेख इत्यादी. यापूर्वी डॉ.निकाळजे यांनी संविधानिक व असंविधानिक लिफाफे व कागदपत्रे यांच्या कलर कोडींगचा प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठवला होता. तो प्रस्ताव निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक सुधारणा समिती ,नवी दिल्ली यांचे पुढे अति महत्वाचा प्रस्ताव म्हणून सादर केला आहे .


डॉ. निकाळजे यांनी वर्ष २००९ मध्ये  झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी स्वाइन फ्लूचा उल्लेख देखील केला आहे. "सध्याच्या कोविड १९ किंवा भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य साथींच्या रोगांची परिस्थिती पाहता हे बदल व्हावेत", अशी विनंती केली आहे .या संदर्भातील सर्व सांख्यिकी माहितीसह या सूचना सादर केल्या आहेत. महानगरपालिका ,राज्यसभा, लोकसभा ,जिल्हा परिषद, तालुका इत्यादी सर्व निवडणुकांच्या वेळी याचा उपयोग होऊ शकेल, त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचा किमान १ तास २०  मिनिटांचा वेळ वाचेल, मतदान टक्केवारी वाढेल ,सामाजिक अंतराचा वेळ कमी होईल ,अशी आशा डॉ. निकाळजे यांनी व्यक्त केली आहे .या प्रस्तावातील संविधानिक व असंविधानिक पाकीटांचे कलर कोडींग, मतदान जागृती बस मॉडेल यांच्या पेटंट, कॉपीराइट किंवा इतर कोणतेही मानधन घेणार नसल्याचे डॉ.निकाळजे यांनी निवडणूक आयोगास कळविले आहे .डॉ.निकाळजे हे प्रशासन ,निवडणूक, उच्चशिक्षण या विषयाचे अभ्यासक व संशोधक आहेत .तसेच ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथे गेली ३१ वर्षे शिक्षकेतर - कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post