पुणे मनपाच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा कोणताही कट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी होऊ देणार नाही

असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : जिलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे :  महानगरपालिकेची मुख्य सभा ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली. पुणे महानगरपालिकेच्या परंपरेप्रमाणे महिन्यातील पहिली सभा ही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात येते.ही परंपरा सत्ताधाऱ्यांनी मोडीत काढत यावेळी प्रथमच विविध विषय चर्चेस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

आज झालेल्या मुख्य सभेत वारजे व बाणेर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यक्रम पत्रिकेत समावेश नसतानाही परिपत्रकाद्वारे ऐन वेळी वारजे व बाणेर येथील रुग्णालयांचा विषय चर्चेत समाविष्ट करण्यात आला. ऑनलाईन सभा  असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे  बहुतांश नगरसेवक या सभेस उपस्थित राहू शकले नाहीत, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराध्यक्ष म्हणून मीही या सभेस सुरुवातीची 10 मिनिटे हजर होतो, मात्र त्यानंतर सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ  येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी मला जावे लागले. प्रस्तुत रुग्णालयांची विषयांची पूर्ण माहिती महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनीही मुख्य सभेत याबाबत काही भाष्य केले नाही पण ठरावाच्या बाजूने मतदान पण केले नाही.

कालच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्या तक्रारीला अनुसरून या विषयाला आमचा विरोधच आहे. माझ्यासह सभागृहातील अनेक ज्येष्ठ सदस्य गैरहजर असताना हा विषय चर्चेस घेण्यात आला.मात्र पुढील आठवड्यात मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन हा ठराव निरस्त करुन या प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याची
विनंती महाराष्ट्र शासनाकडे करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.तसेच पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा  टाकणारा कोणताही कट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही जगताप यांनी दिला

Post a Comment

Previous Post Next Post