निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार ..



प्रेस मीडिया ऑनलाइन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

 पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 86 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावर हरकती व सूचना घेऊन 25 फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडेल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. शहरातील 46 प्रभागांमधून 139 नगरसेवक निवडण्यात येणार आहे.

त्यासाठी निवडणूक विभागाने कामाला सुरूवात केली आहे. शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. निवडणुकीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याकरिता महापालिकेच्या दूरसंचार विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शंभर कॅमेरे व त्यासाठी लागणारी यंत्रणा घेण्यासाठी महापालिकेने 89 लाख 28 हजार रुपये खर्च निविदेमध्ये नमूद केला होता.

त्यामध्ये मेसर्स वैभव एंटरप्रायजेस यांनी 3.50 टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यानुसार 86 लाख 16 हजार 58 रुपयांमध्ये त्यांनी काम करण्यास समर्थता दाखवली आहे. त्यानुसार निविदेमधील अटी व शर्तींनुसार त्यांच्याकडून करारनामा करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर खरेदी केलेले सीसीटीव्ही यंत्रणा महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. वायसीएम, नवीन जिजामाता, थेरगाव व नवीन भोसरी रुग्णालयांमध्ये या कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्र, संवेदनशील मतदान केंद्रांवर राहणार नजर - थॉमस नरोन्हा

निवडणुकीमध्ये गैरप्रकार घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आवश्‍यक आहे. शहरातील जे केंद्र संवेदनशील आहेत, त्या केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून नजर ठेवण्यास मदत होणार आहे. निवडणुकीसाठी शंभर कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post