किरण माने यांना महिला कलाकारांनी केलेल्या तक्रारींमुळे

मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला  : स्टार प्रवाह चा खुलासा.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 स्टार प्रवाह'वरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत 'विलास पाटील' ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता.त्यावर आधी मालिकेच्या निर्मात्यांनी आणि आता स्टार प्रवाह या वाहिनीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्टार प्रवाहने एक अधिकृत निवेदन जाहीर करून किरण माने यांच्यावरील कारवाईबाबत स्पष्ट केलं आहे. या निवेदनानुसार, मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणाऱ्या किरण माने यांनी आपल्यावरील कारवाई संबंधात केलेले सर्व आरोप हे निराधार आणि योजलेले आहेत. अशा प्रकारे आरोप होणं हे खरोखर दुर्दैवी आहे. किरण माने यांच्यावरील कारवाई ही त्यांच्या विरोधात त्यांच्याच सह कलाकारांनी, विशेषतः महिला कलाकारांनी केलेल्या तक्रारींमुळे झाल्याची पुष्टी मालिकेच्या निर्मिती संस्थेने केली आहे. माने यांच्या विरोधात त्यांच्या सह कलाकार, दिग्दर्शक आणि यूनिट मधील अन्य लोकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. माने यांचं सेटवरील वर्तन हे अत्यंत उद्धट आणि आक्षेपार्ह होतं. त्याचा त्रास झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, माने यांना आधी अनेकदा इशाराही देण्यात आला होता. पण, माने यांच्या वर्तनात बदल न झाल्याने सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. कलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वर्तणूक मिळत असल्याने त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो आणि त्याच वेळी आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण वाहिनीतर्फे करण्यात आलं आहे.

या आधी मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांनी देखील सामना ऑनलाईनला दिलेल्या प्रतिक्रियेत किरण माने यांच्या वर्तणुकीचा उल्लेख केला होता. माने यांच्या वर्तणुकीमुळेच त्यांची मालिकेतून हकालपट्टी झाली असून त्याच्याशी कोणताही राजकीय संबंध नाही, असं सुझाना यांनी स्पष्ट केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post