संगमनेर तालुक्यात वाळू चोरी पाठोपाठ आता मुरुमाचीही .....

प्रशासनाकडून मात्र मुरूम तस्करांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 संगमनेर तालुक्यात वाळू चोरी पाठोपाठ आता मुरुमाचीही मोठय़ा प्रमाणावर चोरी होत आहे. तालुक्यातील निमज परिसरात खुलेआम मुरुमाचा उपसा होत आहे. या ठिकाणाहून वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.अनेकदा तक्रारी होऊनही प्रशासनाकडून मात्र मुरूम तस्करांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर तालुक्यातील मुळा, प्रवरा या नदीपात्रांतून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू तस्करी सुरू असतानाच संगमनेर तालुक्यात आता मुरूम तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मुरुमाची चोरी होत आहे. तालुक्यातील निमज गावात गेल्या वर्षापासून प्रचंड प्रमाणात मुरूम उपसला जात आहे. जिल्हा परिषद शाळेसमोर मुरूम उपसा केला जात आहे.

ग्रामपंचायतीतही या मुरूम उपसाच्या विरोधात ठराव करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी मुरूम उपसा करणारा इसम कोणालाही दाद देताना दिसत नाही. विरोध करणाऱया ग्रामस्थांना दमदाटी करण्याचे काम संबंधित मुरूम तस्कर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. सामाजिक वनीकरण खात्याच्या जागेतूनही मुरुमाची तस्करी केली जात आहे. वनखात्याचे कर्मचारी याबाबत लक्ष देत नाही. वर्षभरात संबंधिताने तब्बल 50 कोटी रुपयांचा मुरूम उचलल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दंड ठोठाऊन ही तस्करी सुरूच...

महसूल प्रशासनाने त्याच्याविरुद्ध काही वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, तरीही त्याचे कारनामे सुरूच असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱयांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित मुरूम उपसा करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गौण खनिजाचे बेकायदेशीररीत्या रोज उत्खनन चालू आहे. अगदी वनविभागाच्या जमिनीमधूनही हे उत्खनन होते. तहसीलदार, जिल्हाधिकारी ते थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या आहेत. तरीसुद्धा संबंधितांवर कारवाई होत नाही. गौण खनिजांच्या उत्खननाबरोबर पर्यावरणाचादेखील ऱहास होत असून, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई होत नाही. राजकीय लागेबांध्यांचा गैरफायदा घेण्यात येतो. तक्रार केल्यानंतर आम्हाला धमकीचे फोन येतात. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पर्यावरण विभागाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत.

- गोरक्ष डोंगरे, सरपंच, निमज.

निमज येथे गौण खनिज उपसा करण्याबाबत कोणालाही परवाना देण्यात आलेला नाही. निमज येथे मुरुमाचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

Post a Comment

Previous Post Next Post