विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्यानं 'शाळा बंद शिक्षण सुरू'



प्रेस मीडिया ऑनलाइन :

जीलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे  : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शिक्षण क्षेत्राचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. राज्यात आणि देशात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही भोर मधील कासुर्डी येथे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा मोकाशे आणि रूपाली सरपाले ओसरीवर शाळा भरवत विद्यार्थी घडवत आहेत.


दत्तनगर येथील शाळेत 21 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्यानं 'शाळा बंद शिक्षण सुरू' या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम शिक्षिका करत आहेत. येथील काही पालक मासेमारीचा व्यवसाय करत असल्याने मुलांना देखील सोबत घेवून जातात. मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

'मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेळेत मुलांना त्यांच्या घरी जाऊन किंवा जेथे विद्यार्थी त्या ठिकाणी शाळा, असा उपक्रम हाती घेतला आहे. शाळा बंद शिक्षण सुरू, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे', असं मुख्याध्यापिका सुरेखा मोकाशे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुलांच्या वेळेनुसार ओसरीवर किंवा मंदिरात मुलांना शिकवण्याचं काम शिक्षिका करत आहेत. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच बालवाडी आणि 5 वी, 6 वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post