कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा चार हजारांहून अधिक शाळा पुन्हा ऑनलाइन



प्रेस मीडिया ऑनलाइन :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट पसरू लागल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा चार हजारांहून अधिक शाळा सोमवारपासून पुन्हा ऑनलाइन झाल्या आहेत . रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आदेश काढला, तर शिक्षण विभागाने रात्री उशिरा व्हॉट्सऍपवरून निरोप दिल्याने शाळा आज सुरू राहणार की बंद, यावरून शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही गोंधळ उडाला होता.

कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग जिल्ह्यात वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालये यापूर्वीच बंद करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. तर, राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना व ओमायक्रॉन संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडूनही आजपासून शाळा ऑफलाइन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय आला. महानगरपालिका शिक्षण समिती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्हॉट्सऍपद्वारे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण 4 हजार 363 शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून राबविण्यात येणारे उपक्रम सुरूच राहणार असून, प्रशासकीय आणि शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज शाळेतून सुरू राहणार आहे.

शाळा सुरू राहिल्यास कारवाई करणार - सतेज पाटील

शासनाचे सर्व नियम पाळून 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात काही शाळाचालकांकडून मागणी होत आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, शासनाचे नियम डावलून शाळा सुरू केल्या तर संबंधित शाळाचालकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला.

तासाला चारशे भाविकांनाच श्री अंबाबाईचे दर्शन

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आता प्रार्थनास्थळावर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना ऑनलाइन पद्धतीनेच दर्शन घेता येणार असून, सध्या ऑनलाईन दर्शनासाठी प्रत्येक तासाला एक हजार भाविकांना दर्शन घेण्याची सोय होती; पण आता प्रत्येक तासाला चारशे भाविकांना सुरक्षेचे सर्व नियम पाळून दर्शन घेण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post