भालीवडी येथे वन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.

हल्ले होत असतील तर वनविभागात सेवा करणे अवघड आहे .



 मीडिया वृत्तसेवा :

नरेश कोळंबे कर्जत


    कर्जत परिसरातील वनविभागाने आपल्या वनविभागाच्या जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाला थांबविण्यासाठी सगळीकडे वनविभागाची आरक्षित जागा पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार भालीवडी परिसरातील वनविभागाच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्याला स्थानिक नागरिकाने मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील भालिवडी येथे घडली आहे.

        मौजे गौळवाडी येथील भालीवडी हद्दीतील वनविभागाच्या नावे असलेली संरक्षित वन सर्वे नंबर २८/२/ब या जागेची पाहणी करण्यासाठी वन कर्मचारी नाथा मसणे आपल्या सहकाऱ्यांसह गेले होते. वनविभागाच्या जागेवर त्या ठिकाणी सिमेंटचे कंपाउंड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी वनरक्षक जी.आर. काकडे आणि महिला वनरक्षक कल्याणी आव्हाळे यांनी हे बांधकाम काही दिवसांपूर्वी झाल्याचं पाहणी करून सांगितलं. यावेळी येथील स्थानिक राजेश उर्फ बाबू वसंत कर्णुक याने कर्मचाऱ्यांना ही भिंत चाळीस वर्षांपूर्वीचे आहे, असे खोटे सांगितले. मात्र नोंदणी प्रमाणे ही भिंत आधीची नसून आत्ताच बांधली असल्याने त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन राजेश कर्णुक यांनी आंबोट गावात राहणारे वनकर्मचारी नाथा मसणे यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यासोबत वन कर्मचारी यांच्यासोबत असलेल्या वनरक्षक जी. आर काकडे आणि वनरक्षक कल्याणी आव्हाळे यांना देखील त्यांनी शिवीगाळ करून मी बघतो तुम्ही इथून बाहेर कसे निघतात अशी धमकी देऊन या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीत कर्मचारी नाथा मसणे यांना डोक्याला जबर मार लागून गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

   वनकर्मचारी प्रामाणिक पणे त्यांचं काम करत असून त्यांच्यावर  हल्ले होत असतील तर वनविभागात सेवा करणे अवघड आहे असे मत वन कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया - 

   आम्ही पाहणीसाठी गेलो असता नुकताच झालेल्या अतिक्रमित बांधकामावर प्रश्न विचारला असता खोट्या उत्तरामुळे आमच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर राजेश वसंत कर्णुक यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारून माझे डोके दगडावर आपटले. त्यामुळे माझ्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याबद्दल आम्ही कर्जत पोलिस ठाणे येथे त्या व्यक्तिबाबत तक्रार नोंदवली आहे. 

     - नाथा भागा मसणे (जखमी वनरक्षक)

प्रतिक्रिया - 

      वन जमिनीची पाहणी करण्यासाठी गेलो असता तिथे नवीन बांधकाम दिसल्यामुळे राजेश वसंत कर्णुक यांना विचारले असता त्यांनी हे बांधकाम ४० वर्ष जुने असल्याचे खोटे सांगितले. परंतु ते पाहताक्षणी एक महिन्यापूर्वी ते बांधकाम असल्याचे दिसून येते . त्यानंतर राजेश वसंत कर्णुक यांनी नाथा मामांना मारायला सुरुवात केली आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांना मारणे बंद केले नाही याउलट आम्हाला धमकी दिली .

       --गुलचंद रघुनाथ काकडे.  (वनरक्षक सावळे)

Post a Comment

Previous Post Next Post