टँब खरेदी अपहारातील रक्कम व्याजासह संबंधित मुख्याध्यापकांकडून वसूल करावी

 नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांची मागणी..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी पालिकेच्या चार केंद्र शाळांमधील टँब खरेदी प्रकरणात सुमारे १८ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.पालिका प्रशासनाने  या प्रकरणातील संबंधीत चार सेवानिवृत्त मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून सदरची रक्कम व्याजासहित वसूल करावी अन्यथा न्यायालयात धाव घेवू ,असा इशारा ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद ,नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

इचलकरंजी पालिकेच्या शिक्षण मंडळाकडील जयभवानी विद्या मंदिर , हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर ,लालबहादूर शास्त्री विद्या मंदिर ,पंडित मोतीलाल नेहरु विद्या मंदिर या चार केंद्र शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी उपयुक्त ठरतील अशा टँब खरेदी प्रकरणात मोठ्या रक्कमेचा अपहार झाल्याचे नुकताच उघडकीस आले आहे. यातील काही शाळांना मंजूर ५० टँबपैकी केवळ २५ टँब प्राप्त झाले होते.विशेष म्हणजे प्राप्त टँब हे विना साँफ्टवेअर असल्याने ते वापराविना धूळखात पडून होते. 

या टँब खरेदी प्रकरणात सुमारे १८ लाख ७० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे माहितीच्या आधारे पुढे आले होते.त्यामुळे आधीच भ्रष्ट कारभाराने चर्चेत असलेली इचलकरंजी पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.त्या मुळे पालिका प्रशासनाने या टँब खरेदी अपहार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून जय भवानी विद्या मंदिरचे तत्कालीन मुख्याध्यापक सुरेश विटेकरी ,हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिरचे मुख्याध्यापक मोहन वरणे ,लालबहादूर शास्त्री विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मंगल कमाने ,पंडित मोतीलाल नेहरु विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मंगल माळी या चार जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून या अपहारातील  सुमारे १८ लाख ७० हजार रुपयांची रक्कम व्याजासहित वसूल करावी ,अशी मागणी ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी केली.तसेच याबाबत पालिकेने तात्काळ कार्यवाही न केल्यास मी स्वतः न्यायालयात धाव घेवू ,असा इशारा देखील पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

Post a Comment

Previous Post Next Post