विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस मध्ये साटंलोटं



प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :

 मुंबई - विधानपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी भाजप आणि कॉंग्रेस मध्ये साटंलोटं पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत कोल्हापूर, धुळे आणि मुंबईत बिनविरोध निवड करण्यावर एकमत झाले.त्यानुसार कोल्हापूरात भाजपच्या अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्या बदल्यात धुळ्यात कॉंग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.

या शिवाय मुंबईत कॉंग्रेसने उमेदवार न दिल्याने भाजपच्या राजहंस सिंह यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्गही सुकर झाला. याशिवाय शिवसेनेचे सुनील शिंदे यांचीही निवड निश्‍चित झाली. विशेष म्हणजे कोल्हापूरात महाडिक आणि पाटील या कट्टर विरोधकांत सामना होणार होता. पण दिल्लीतून सकाळी फोन आल्यानंतर सूत्रे फिरली. महाडिक कुटुंबीयांची बैठक झाल्यानंतर अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेतला.

कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतेज पाटील दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. यावेळी सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे देखील आभार सतेज पाटील यांनी मानले. राजकीय निवडणुका या वैयक्तिक पातळीवर होऊ नयेत, असेही यावेळी सतेज पाटील यांनी बोलून दाखवले.

Post a Comment

Previous Post Next Post