अपहरण प्रकरणी महिला आरोपीस चार वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

 अल्पवयीन आरोपीची सुनावणी बाल न्यायालयाकडे वर्ग


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या अपहरप्रकरणी दोषी ठरवत इचलकरंजी येथील अप्पर सत्र न्यायाधीश एच. बी. शेळके यांनी सुमैय्या अमीर शेख या महिला आरोपीस प्रत्येकी चार वर्षाचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एच. एन. मोहिते-पाटील यांनी काम पाहिले. तर यातील अन्य संशयित हा अल्पवयीन असून त्याचा खटला बाल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.

इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ८ जानेवारी २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली होती. याचा तपास सुरु असताना शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक अमोल माळी यांनी संशयित आरोपी आणि पिडीत मुलीस कर्नाटकातील मांगूर येथून ताब्यात घेतले होते. तर तत्कालीन पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांनी सुमैय्या अमीर शेख हिच्यासह एका अल्पवयीन मुलावर इचलकरंजी अप्पर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपी सुमैय्या शेख हिने अल्पवयीन मुलाशी लग्न लावण्याचे आमिष दाखवून पिडीताचे अपहरण केले होते. पिडीत मुलगी ही एका विशिष्ट समाजाची असल्यामुळे या प्रकरणात पिडीताच्या जबाबानुसार या प्रकरणात 366 अ हे कलम वाढविण्यात आले होते. येथील जिल्हा

व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष व पिडीत मुलीचा जबाब अत्यंत महत्वाचा ठरला. तसेच सरकारी वकिल हेमंत नागेश मोहिते-पाटील यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून अप्पर सत्र न्यायाधीश शेळके यांनी सुमैय्या शेख हिला प्रत्येकी चार वर्षाचा सश्रम कारावास आणि एक-एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दरम्यान, यातील अन्य संशयित अल्पवयीन  असून त्याने सुनावणीदरम्यान स्वत:स अल्पवयीन शाबित केल्याने त्याचे काम बाल न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या कामी कोर्ट कॉन्स्टेबल सागर कांबळे यांचेही सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post