शिवतीर्थ परिसराचे पावित्र्य राखण्याची मराठा महासंघाची मागणी

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ परिसरात कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नेमून याठिकाणचे पावित्र्य राखावे ,अशा मागणीचे निवेदन आज गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिष्टमंडळाने इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे सादर केले.तसेच याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिष्टमंडळाने दिला.

महाराष्ट्र राज्याबरोबरच देश - विदेशातील नागरिकांचे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे  प्रेरणास्थान व श्रध्दास्थान आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानक परिसरातील अश्वारुढ पुतळ्याचे व परिसराचे नुकतेच सुशोभीकरण करुन त्याचे   शिवतीर्थ हे नामकरण करण्यात आले आहे. या शिवतीर्थ सुशोभीकरणामुळे इचलकरंजी शहराच्या नांवलौकिकात नव्यानं भर पडली आहे .ही खरंतर इचलकरंजी शहरवासियांसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे. या

शिवतीर्थचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला आहे. त्यामुळे सदर शिवतीर्थ परिसर पाहण्यासाठी आता शहरवासियांबरोबरच बाहेरगांवचे नागरिक मोठी गर्दी करत आहेत.यातूनच याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक कर्मचारी नसल्याने काही नागरिकांकडून गैरप्रकार घडत आहेत.यामध्ये बुरुजांवर उभे राहून व मावळ्यांच्या पुतळ्यांवर हात ठेवून फोटो काढणे ,आरडाओरड करणे ,गर्दी करणे यासह अन्य गैर प्रकारांमुळे या शिवतीर्थचे पावित्र्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याचा पालिकेने वेळीच विचार करुन याठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करून कडक नियमांची अंमलबजावणी करत शिवतीर्थचे पावित्र्य राखण्यासाठी संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत.या संदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडू ,असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना लवकरच शिवतीर्थ याठिकाणी नागरिकांसाठी नियमावली करुन त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे शिवतीर्थचे पावित्र्य चांगल्या पध्दतीने राखण्यासाठी वेळप्रसंगी प्रशासन कठोर भूमिका घेईल ,अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत ,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने ,युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक रावळ ,तालुका उपाध्यक्ष नितीन पाटील ,शहर उपाध्यक्ष वैभव खोंद्रे ,क्रीडा शहराध्यक्ष विजय मुतालिक ,रामचंद्र भोसले ,अरुण मस्कर ,अजित तिप्पे ,गणेश नेमिष्टे ,उमाकांत लोंढे यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post