महापालिका निवडणुका आता तोंडावर , ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नगरसेवकांच्या सदस्य संख्येत 15 टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरु 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनिल पाटील : 

मुंबई : बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यावर मुंबई महापालिका वगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत 15 टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.येत्या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यापूर्वी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पण असं असलं तरी मुंबई महापालिकेत नगरसेवक वाढविण्याला सेनेला रेड सिग्नल असल्याची माहिती समोर येतीय.

राज्यात मुंबईसह सध्या 27 महापालिका आणि 379 नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते.

2011 नंतर जणगणना नाही, फेब्रुवारीत महापालिका निवडणुका.....

सध्या सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान 16 तर जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान 65 तर जास्तीत जास्त 175 पर्यंत आहे. मुंबई महापालिके त ही संख्या 227 आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन 2011 ची जणगणना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान 15 महापालिकांच्या तसेच सुमारे 100 हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

येत्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत....

राज्य सरकारच्या प्रस्तावित अध्यादेशाच्या माध्यमातून महापालिका कायद्यात सुधारणा करुन सदस्यवाढ करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेबाबत सदस्य वाढविण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नसल्याने मुंबई बाबतचा निर्णय काय होतो? काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

Post a Comment

Previous Post Next Post