महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे

 ती किंमत पेट्रोल-डिझेलच्या भाववाढी पासून माचीसच्या भाववाढी पर्यंत जनता चुकवीत आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल, डिझेल महागले, असे केंद्रीय मंत्री रामचंद्र तेली सांगतात. पेट्रोलने शंभरी पार केली त्यावर सगळेच गप्प. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सगळेच अडकले आहेत!

दिवाळी येत आहे. दिवाळी असली काय नसली काय, आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके तर 365 दिवस फुटत असतात. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे या वेळची दिवाळी मोकळय़ा वातावरणात साजरी होईल; पण सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय..? 

महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱयांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱया जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका. सत्ताधारी भाजपची यावर मखलाशी कशी ती पहा. त्यांचा युक्तिवाद असा की, ''महाराष्ट्रात किंवा देशात पेट्रोलने शंभरी पार केली म्हणून का रडता? पाकिस्तानातही पेट्रोल 137 रुपयांवर पोहोचलेय!'' पण ही वकिली करणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, हे '137' पाकिस्तानी रुपयांत आहेत. जे भारतीय रुपयांत 59 रुपये होतात. भारतात पेट्रोलचे भाव दिल्लीत 106 रुपये आणि मुंबईत 115 रुपयांपर्यंत पोहोचले. यावर कुणी बोलत नाही व सगळेच राजकीय पक्ष मुंबईच्या समुद्रातील क्रुझ पार्टीत अडकून पडले आहेत.

जरा ऐका हे!

रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारले, ''साहेब, पेट्रोल-डिझेलमुळे लोकांचे जगणे कठीण झाले. काहीतरी करा!'' यावर मंत्री महोदय काय सांगतात, ''मोदींनी देशभरात मोफत कोरोना लसीची पूर्तता केल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.'' म्हणजे मोफत लसीकरणाचा भार शेवटी जनतेच्याच माथी मारला जात आहे. मग मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात, हा प्रश्न देशाला पडला आहे. आता सत्य असे आहे की, संपूर्ण देशातील लसीकरणाचा खर्च 67,113 कोटी इतका दाखवला आहे. पण मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर 'कर' लावून 25 लाख कोटींची वसुली आजपर्यंत केली आहे. पुन्हा कोविडशी मुकाबला करण्यासाठी 'पीएम केअर फंड' हे बिगर सरकारी खाते उघडून त्यात उद्योगपती, सरकारी उपक्रम यांच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये जमा केले ते वेगळेच. जनतेचे दिवाळे निघत आहे व राज्यकर्त्या पक्षाची ही अशी दिवाळी जोरात सुरू आहे. महागाईचे चटके कसे? तर इतक्या वर्षांत प्रथमच 'माचीस बॉक्स'देखील दुपटीने महागला. एक रुपयांचा माचीस बॉक्स दोन रुपयांना झाला. रस्त्यावर जाता-येता सहज एक दुसऱयाकडे 'माचीस आहे का?' असे विचारून विडी-सिगारेट शिलगावली जात होती आणि माचीस सहज दिली जात होती. एक-दुसऱयाच्या घरात माचीसच्या काडय़ांचे अदान-प्रदान होत असे. आज ती माचीसही महाग झाली. तेव्हा मला अश्मयुगातील माणूस आठवला. तेव्हा अग्नी कसा निर्माण करीत होते? दोन दगडांचे घर्षण करून अग्नी निर्माण केला जात असे. त्यातून चुली पेटवल्या जात असत. आताही बहुधा तेच दिसू लागेल. अयोध्येत राममंदिर निर्माण होतच आहे. त्यामुळे यानिमित्ताने नवे 'रामराज्या'चेही दर्शन घडेल आणि 'विकास' म्हणजे काय ते सुद्धा लोकांना समजेल. विकासासाठी किंमत मोजावी लागते. ती किंमत पेट्रोल-डिझेलच्या भाववाढी पासून माचीसच्या भाववाढीपर्यंत जनता चुकवीत आहे.

चुली विझत आहेत!

उज्ज्वला अंतर्गत मिळणारे गॅस सिलेंडरही महाग झाले. अनेक राज्यांत लोकांनी ही सरकारी गॅस सिलेंडरही भंगारात विकून टाकली. महाराष्ट्रात महिलांनी महागाईविरोधात आंदोलन केले. त्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम पार पाडला. विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 900 पार झाली. माचीसची किंमत 14 वर्षांत वाढली नव्हती. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे माचीसची किंमत वाढत आहे. पण आपले पंतप्रधान स्वतःसाठी एक विशेष विमान खरेदी करत आहेत व त्या विमानासाठी देशाच्या तिजोरीतून 18 हजार कोटी रुपये खर्च होतील.

माचीस महागण्याशी, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल भाववाढीशी या 18 हजार कोटींच्या खासगी विमान खरेदीचा संबंध जोडू नये. पंतप्रधानांच्या सोयीसाठी असे एक विमान असणे ही गरज आहे. पण माचीस, तेल, नोकऱया, पगार ही लोकांची 'चैन' झाली आहे, त्याचे काय? दिल्लीत 20 लाख कोटी रुपये खर्च करून 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्प हट्टाने उभा केला जात आहे. 

त्यासाठी दिल्लीची आन-बान-शान धुळीस व खड्डय़ांत मिळवली आहे. संपूर्ण नवी दिल्लीचे रूपांतर खोदकामात झाले. नवी संसद, नवी कार्यालये, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान हे सर्व जनतेवर लादलेल्या महागाईच्या ओझ्यातून उभे राहणार असेल, तर काय करायचे ? संतापाच्या भरात काही पेटवायचे म्हटले तर माचीसची काडीही महाग झाली. तरीही दिवाळी येतच आहे. ती साजरी करूया, दिवे पेटवूया. त्या प्रकाशातच नवा मार्ग शोधता येईल!

Post a Comment

Previous Post Next Post