खळबळजनक : पुन्हा घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी , विक्रेत्यावर देहूरोड पोलिसांची कारवाई .


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरआली शेख : 

पिंपरी चिंचवड : घरगूती गॅस सिलेंडर मधून  असुरक्षितरीत्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये काढून ग्राहकांची फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे चार दिवस आधी दापोडी मध्ये एक गॅस विक्रेत्यावर पोलीसांनी कारवाई केली होती, दरम्यान शहरात दुसरी घटना रावेत हद्दीत घडली आहे.

गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करताना पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या कामगारासह गॅस एजन्सीच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दि. 29 सकाळी दहा वाजताच्या सुमारास दत्तनगर, किवळे येथे घडली असून अविनाश हरी नांगरे (वय 24, रा. दत्तनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गॅस एजन्सीचा मालक संतोष (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या प्रत्येक गॅस एजन्सी विक्रीत्याने इलेक्ट्रॉनिक मापदंड बरोबर घेऊन ग्राहकाला गॅस सिलेंडर वितरित करताना वजन करून दिले पाहिजे अशी मागणी ग्राहकांना मार्फत करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याची गॅस एजन्सी आहे. दत्तनगर किवळे येथे पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी अविनाश बुधवारी सकाळी भरलेल्या गॅस सिलेंडर मधून लहान आकाराचे तीन ते पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत होता. गॅस चोरत असताना अविनाश याने कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली  नव्हती जर कुठली दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे,

याबाबत आरोपी संतोष याला माहिती होते. त्याने रिकामे खाली झालेले गॅस सिलेंडर गोडाऊन मध्ये जमा न करता भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरित करण्यासाठी न जाता गॅस चोरीसाठी सहाय्य केले. आरोपींकडून २१ हजार ९०३ रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, ३०० रुपयांचे दोन पितळी धातूचे रिफील, २२० रुपयांचे दोन नारंगी पाईप असा ऐवज जप्त केला आहे. देहूरोड पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post