महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर धाड पडली असून शहराच्या राजकारणात खळबळ


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी (दि. 18) साडेचारच्या सुमारास पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकली आणि सभापतींच्या स्वीय सहायकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले.रोकड, कागदपत्रे ताब्यात घेत स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि कर्मचाऱयांची कसून चौकशी केली. पंचनामा, जाबजबाब घेत अडिच तासानंतर सभापती लांडगे आणि चार कर्मचाऱयांना अटक केले. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर धाड पडली असून शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून 'टक्केवारी'च्या व्यवहारात आपले नाव येते काय, या भीतीने अनेकांना कापरं भरली आहेत.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (दि.18) पार पडली. या ऑनलाईन बैठकीत सुमारे 46 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी अॅड. नीतीन लांडगे होते. दुपारी तीनच्या सुमारास ऑनलाइन सभा संपली. सभा संपल्यानंतर सभापतींसह भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी आयुक्त दालनात एका विषयावर सादरीकरणासाठी रवाना झाले. स्थायी समितीच्या उर्वरित सदस्यांची तिसऱया मजल्यावरच चहलपहल होती. नेहमीप्रमाणे स्थायी समिती सभापती चारच्या सुमारास पत्रकार परिषदही घेणार होते. तथापि, आयुक्तांकडील बैठकीस विलंब होत असल्याचा सांगावा सभापतींनी धाडला. त्याचदरम्यान स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना 'एसीबी'च्या अधिकाऱयांनी तळमजल्यावर लाच घेताना रंगेहाथ पकडले. साध्या वेशातील पोलिसांनी पिंगळे यांच्या मुसक्या आवळत तिसऱया मजल्यावर आणले.

स्थायी समिती सभापतींच्या दालनात नेत त्यांना पोलिसी खाक्या दाखविला. स्थायी समिती स्वीय सहायकाचे दालन बंद करून घेत तेथे उपस्थित कर्मचाऱयांची झाडाघडती घेतली. त्यात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. कर्मचाऱयांच्या चौकशीनंतर 'एसीबी' ने आपला मोर्चा सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्याकडे वळविला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ज्ञानेश्वर पिंगळे आणि लिपीक विजय चावरीया, संगणक ऑपरेटर राजेंद शिंदे, शिपाई अरविंद कांबळे या कर्मचाऱयांना 'एसीबी'चे अधिकारी मोटारीतून पुण्याच्या कार्यालयात घेऊन गेले. त्या पाठोपाठ स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांनाही पावणेसातच्या सुमारास पुण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

अन् सावज टप्प्यात आले

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुराव्यानिशी तक्रार केल्यावर एसीबीच्या अधिकाऱयांनी साप्ताहिक सभेच्याच दिवशी सापळा रचला. सकाळपासूनच एसीबीचे अधिकारी साध्या वेशात तिसऱया मजल्यावर पाळत ठेवून होते. स्थायी समिती दालनात येणाऱया-जाणाऱया प्रत्येकाच्या हालचाली बारकाईने टिपल्या जात होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास सावज टप्प्यात आले. लाच घेताना ज्ञानेश्वर पिंगळे यांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकारानंतर 'एसीबी'च्या अधिकाऱयांनी सर्वप्रथम महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना वर्दी दिली. तसेच, काही अधिकारी, पदाधिकाऱयांकडेही चौकशी करत जाबजबाब नोंदविले. या लाच प्रकरणामुळे सत्तारुढ भाजपची पुरती बेअब्रू झाली आहे. कारवाईदरम्यान महापालिका भवनात, परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

Post a Comment

Previous Post Next Post