भाजपने पुणेकरांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यावर डल्ला मारण्याचेच काम केले आहे...प्रशांत जगताप





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 


 पुणे महापालिकेच्या मालकीच्या सर्व ॲमेनिटी स्पेस भांडवलदार, गुंतवणूकदार व उद्योजकांना दीर्घ मुदतीच्या कराराने देण्याचा अर्थातच विक्रीचाच दृष्टीकोन ठेवून धनदांडग्यांच्या घशात या मालमत्ता घालण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीत मान्य करून घेतला.

सर्वसामान्य पुणेकरांच्या सोयीसाठी असलेल्या या ॲमेनिटी स्पेसवर डल्ला मारण्याच्या भाजपच्या या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. मात्र, भाजपने पाशवी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करून घेतला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

जगताप म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने महापालिकेत मनमानी कारभार सुरू केला असून, त्याचेच आणखी एक उदाहरण बुधवारी स्थायी समितीत पाहण्यास मिळाले. पुणे महापालिकेच्या मालकीच्या सर्व ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीच्या कराराने अर्थातच विक्रीचाच दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून भांडवलदार, गुंतवणूकदार व उद्योजकांच्या घशात घालण्याचा ठराव सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला.

शिवाय, अशा प्रकारचा विषय असेल, तर प्रशासनाने त्याबाबतचा कृती आराखडा सर्वपक्षीय सदस्यांपुढे ठेवावा. आपल्याकडे किती ॲमेनिटी स्पेस आहेत, त्यापैकी किती दीर्घ मुदतीच्या कराराने देणार आहोत, शिल्लक किती राहणार आहेत, भविष्यातील नियोजित प्रकल्पांसाठी राखीव जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे का, राखीव जागा ठेवण्यात आल्या नसतील, तर किमान 25 टक्के जागा कायमस्वरुपी मोकळ्या ठेवण्यात यावेत.

या जागांवर बिल्डरांच्या निवासी किंवा व्यावसायिक इमारती उभ्या राहता कामा नयेत, डीसी रूलमध्ये अनुदेय असलेल्या वापरालाच परवानगी मिळावी, याबाबतचे नियोजन केल्यास आम्ही या ठरावावर विचार करू, तोपर्यंत ठराव मान्य करू नये, अशी विनंती बैठकीपूर्वी करण्यात आली होती. परंतु, पाशवी बहुमताच्या जोरावर भाजपने हा ठराव मान्य करून घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या कृतीचा तीव्र निषेध करण्यात येत असून, निश्चितच काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठीच हा ठराव मान्य करण्यात आल्याचा आमचा थेट आरोप आहे. मुळात ॲमेनिटी स्पेस राखीव ठेवण्यात भाजपचे काहीही कर्तृत्व नाही. आज महापालिकेच्या मालकीच्या ज्या ॲमेनिटी स्पेस आहेत, त्या यापूर्वी आम्ही सत्तेत असतानाच्या काळातील आहेत. परंतु, गेल्या साडेचार वर्षांत कोणतीही कामगिरी करता न आलेल्या भाजपने पुणेकरांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यावर डल्ला मारण्याचेच काम केले आहे.

शहराच्या विकासाबाबत व पुणेकरांच्या बाजूने आम्ही यापुढेही सभागृहात हा मुद्दा उचलून धरूच. शिवाय, भाजपच्या वर्तनात काही बदल झाला नाही, तर याबाबत राज्य सरकारकडे तक्रार करणार आहोत. पुणेकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षाची लढाई निश्चितच लढेल, असा शब्द आम्ही देऊ इच्छितो.

Post a Comment

Previous Post Next Post