नियम न पाळणाऱ्यांना शिक्षा करा पण दंड नको ,



पुणे ग्रामीण - भोर तालुक्‍यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे यात शंका नाही; पण सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आसताना सर्वसामान्यांच्या अज्ञानामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर भोर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस दंडात्मक कारवाई करताना दिसत आहेत.

आधीच करोना लॉकडाऊन काळात 8-9 महिन्यांत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, त्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. करोनाला रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे हा उपाय नाही. प्रशासनाचे नियम न पाळणाऱ्यांना शिक्षा करा पण दंड नको, असे दबक्‍या आवाजात नागरिक बोलत आहेत. भोर तालुक्‍यात करोनाचा पहिला रुग्ण 14 एप्रिल 2020 ला भोरच्या ग्रामीण भागातील नेरे या गावी आढळून आला होता.मात्र त्यानंतर करोना रुग्णांचा हा आकडा वाढतच गेला आणि भोर शहरासह तालुक्‍याला करोनाने ग्रस्त केले. यामध्ये जानेवारी 2021 पर्यंत सुमारे 2064 रुग्ण आढळले. करोनावर मात करण्यात भोरचे प्रशासन प्रयत्न करीत होतेच. या दरम्यान 1971 रुण्णांनी करोनाशी लढा देऊन यशस्वी मात केली, असली तरी करोनाने तालुक्‍यातील 77 जणांचा बळी घेतला. मध्यंतरीच्या काळात करोना संपला असल्याची चिन्हे दिसत असतानाच तालुक्‍यात पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे.

23 फेब्रुवारी 2021 पर्यंत 17 रुग्ण आढळून आले. यात ग्रामीण भागातील 10, तर भोर शहरातील 7 बाधितांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागातील दोन जणांचे आधारकार्ड भोर तालुक्‍यातील असून यात एकाचा दोन दिवसांपूर्वी करोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर भोर शहरतील सात बाधितांमध्ये दोन वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

करोनाला कोणीही ग्रहीत न धरता मास्कचा, सॅनिटायझरचा वापर आणि गर्दीपासून दूर राहणे या प्रशासनाच्या नियमांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन केले तरच भविष्यात करोनाला तालुक्‍यातून हद्दपार करणे शक्‍य होणार आहे. मात्र, यासाठीच या प्रमुख गोष्टींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपेक्षा त्यांना शिक्षा करणे अधिक योग्य वाटते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post