विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलत चालली.

विधानसभा निवडणुकीनंतर  महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलत चालली.


PRESS MEDIA LIVE :

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. युतीतील शिवसेना आघाडीकडे आल्याने समीकरणे बदलली. विभागा-विभागांतील गणिते बदलली. बदलत्या स्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बळ मिळाले. राज्यातील सत्तेमुळे फुगवटा आलेल्या भाजपचा फुगा सत्ता जाताच फुटू लागला. आघाडी आणि भाजप यांच्या ताकदीची तुलना केली तर पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि काही प्रमाणात सोलापूर जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी मजबूत होत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित राहिले तर भाजपची पश्‍चिम महाराष्ट्रातील अवस्थाया केविलवाणीच होईल, यात  असण्याचे कारण नाही.

मुळात सातारा-सांगली-कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस संस्कृती वाड्या-वस्त्यांपर्यंत रुजलेली आहे. आणि आता त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. त्या तुलनेत मूळ भाजपला नगण्य स्थान आहे. भाजपची ताकद पक्षसंघटनेत नाही तर ती व्यक्‍तीकेंद्रित आहे. दोन्ही कॉंग्रेसमधून गळाला लागलेल्या नेत्यांच्या ताकदीवर आधारित भाजपची वाटचाल सुरू झाली. हे नेते असतील तर त्यांच्या विभागापुरता भाजप अशी स्थिती आहे. दोन्ही कॉंग्रेसमधून आयातांच्या बळावर पाच वर्षे झालेले राजकारण भाजप बलवान झाल्याचे चित्र उभे करीत होते. मात्र, आता अनेकांना आपल्या मूळ पक्षातच बरे आहे, ही भावना बळावू लागल्याने भाजपपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याचीच शक्‍यता आहे. कॉंग्रेस विचारधारेच्या पश्‍चिम महाराष्ट्रात बस्तान बसविण्याचे भाजपचे स्वप्न, स्वप्नच ठरण्याची अधिक शक्‍यता आहे.

पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांची महाविकास आघाडीची बाजू सध्या तरी खणखणीत आहे. नजिकच्या काळात होणारी कोल्हापूरच्या महापालिकेची निवडणूक या आघाडीच्या साऱ्या राजकारणाला आणखी दिशा देणारी ठरणार आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढाया केल्या तर भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो, हे दाखवणारी निवडणूक कोल्हापूर सिद्ध करण्याच्या तयारीत आहे.

कोल्हापूरमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे वर्चस्व आहे. महापालिका, जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता आहे. कॉंग्रेसचे चार व एक पुरस्कृत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, शिवसेना एक व एक पुरस्कृत आणि जनसुराज्य पार्टी एक असे दहा आमदार; नुकतेच विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले दोन असे 12 आमदार आहेत. दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोल्हापुरातील असले तरी भाजपचा सध्या एकही आमदार नाही. महाविकास आघाडीमध्येही कोल्हापूरला महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हसन मुश्रिफ यांच्याकडे ग्रामविकास खाते आहे. कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आहे. शिवसेना पुरस्कृत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे मंत्रिपद आहे.

विधानपरिषद निवडणूक निकालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अडचणीत आले आहेत. कोल्हापूरच्या भाजपकडूनच प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी होऊ लागली आहे. या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित राहिले तर भाजपची अवस्था आणखीनच कठीण होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाच विभागीय समीकरणे भक्‍कम करू शकतो.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तीन तर शिवसेनेकडे दोन व कॉंग्रेसचे एक असे सहा आमदार आहेत. त्याशिवाय विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, विलासराव पाटील उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर अशी मातब्बर मंडळी महाविकास आघाडीकडे आहेत. विळ्या-भोपळ्याचे नाते असणारे पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर या दोन्ही नेत्यांचे गट एकत्र आल्याने कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपद आहे. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे उमदे नेतृत्त्व आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक अशा संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ही महाविकास आघाडीची भक्‍कम बाजू सातारा जिल्ह्यात आहे.

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे, मदन भोसले, अतुल भोसले हे नेते भाजपमध्ये असले तरी शिवेंद्रसिंहराजे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असणारी जवळीक खूप काही सांगून जाते. उदयनराजे यांना पक्षापेक्षा जनता महत्त्वाची वाटते. जयकुमार गोरे यांच्या मनाची द्विधा अवस्था विचारात घेण्यासारखी आहे. या स्थितीत महाविकास आघाडी अधिक मजबूतच होण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात काही प्रमाणात भाजप आणि महाविकास आघाडीत मोठा संघर्ष आहे. सध्या कागदावर तरी भाजप थोडाफार पुढे असला तरी भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी इथे नेटाने प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आहे. सोलापूर आणि माढा असे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहेत. भाजपचे पाच आमदार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेना व कॉंग्रेसचा एक असे सहा आमदार आघाडीकडे आहेत. भाजपची ही ताकद मोठी दिसत असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ती पोखरायला सुरवात केली आहे. त्यासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना ताकद दिली जात आहे. भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते पाटील व कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे या धुरंधरांसह नव्या पिढीतील नेतेमंडळी एकमेकांना शह देत आहेत. आगामी सोलापूर महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेतील रस्सीखेच याभोवती सुरू असणारे सध्याचे राजकारण कोणाला साथ देणार ते महत्त्वाचे ठरणार आहे. तरी भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन खिंड लढविली जाण्याचीच शक्‍यता अधिक आहे.
पुणे जिल्ह्यातील सत्तास्थानी भाजपचा जोर दिसत आहे. मात्र, यापुढील काळातील निवडणुका भाजपसाठी अवघड होत चालल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका भाजपकडे आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक सदस्य भाजपबरोबर मनाने आहेत की नाहीत, याबाबत साशंकता आहे.

पूर्वी दोन्ही कॉंग्रेसमध्येच असणारे भाजपमध्ये गेले आणि राज्यातील सत्ता गेल्याबरोबर त्यांची चलबिचल सुरू झाली. त्याशिवाय अजित पवार यांचे नव्या जुन्यांना आपल्या बाजूला खेचण्याचे राजकारण वेगळा रंग दाखवणार आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्या बेरजेच्या राजकारणाने राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक मजबुतीकडे वाट चालत आहे. भाजपअंतर्गत नाराजीचा फॅक्‍टरही मोठा बनत चालला आहे. कॉंग्रेसची स्थिती नेत्याविना क्षीण दिसत आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी त्यातून भाजपसाठी काही निष्पन्न होईल, याची खात्री नाही. या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकेल.

सांगलीतही महाविकास आघाडी व भाजपमध्ये चुरस असली तरी महाविकास आघाडीची एकी भाजपची चांगलीच पिछेहाट करू शकतो, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील अशा दिग्गजांच्या भूमीत भाजपची ताकद वाढली. मात्र, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे विश्‍वजित कदम यांनी ठरवून जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. दोघेही मंत्री आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरत आहे. भाजपचे तीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन, कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक असे आमदार त्याशिवाय विधानपरिषदेचे मोहनराव कदम आणि सुरेश लाड हे दोन आमदार आहेत. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, तीन आमदार आणि संग्राम देशमुख गटाचीही ताकद मोठी आहे.

सहकारी संस्थांच्या राजकारणातील नेतेमंडळी आपापल्या भागात वरचढ आहेत. महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यात एकजिनसीपणा दाखविणार का हाही प्रश्‍न आहे. दोन्ही कॉंग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण थांबविण्याचे प्रयत्न झाले तर भाजपला अडचणीचे ठरू शकते.
केंद्रातील सत्ता आणि राज्यात युतीमुळे मिळालेली सत्ता यामुळे पाच वर्षांत भाजपमध्ये दाखल झालेल्या कॉंग्रेसी विचारांच्या नेत्यांमुळेच पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप बळकट होत असल्याचे चित्र होते. आता ते धूसर होऊ लागले आहे.

आणखी काही महिन्यात ते चित्र पुसले जाऊन महाविकास आघाडी नवे रंग भरू शकते. शिवसेना आणि कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसची महत्त्वाकांक्षा जागोजागी दिसू लागली आहे. राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसचे खच्चीकरण होणे, शिवसेनेलाही पुढे येऊ न देणे असे सुरू असले तरीही, एकीचे सूत्र अवलंबिले तर महाविकास आघाडीचे गणित पश्‍चिम महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राज्यात यशाकडे वाटचाल करू शकते. सत्तेच्या पोटात राहून विरोधकांना आपल्याकडे खेचून मजबुतीचा फुगा बनविता येतो. पण आपले मूळ संघटन बळकट असेल तरच पक्ष मजबूत होऊ शकतो, याचा अनुभव भाजप घेत आहे. त्यामुळेच यापुढील निवडणुका भाजपसाठी आव्हानाच्याच ठरतील. मोदी-शहा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालवायचा असेल तर मूळ संघटन मजबूत नसल्याचा तोटा भाजपला मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सध्यातरी दोन्ही कॉंग्रेससह महाआघाडीचा फॉर्म्युलाच लागू होत आहे.

सातारा जिल्ह्यातही सातारा विधानसभा मतदारसंघ वगळला तर दोन्ही कॉंग्रेसचाच वरचष्मा आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून आयात नेत्यांचे बळ भाजपला मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व माणमधून जयकुमार गोरे. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांना भाजपने राज्यसभेवर दिलेली संधी, यामुळे भाजपचे किमान अस्तित्त्व आहे.


Post a comment

0 Comments