घरकुल प्रश्न :घरकुल प्रश्न : दहा डिसेंबर पर्यंत बांधकामास सुरुवात न केल्यास 11 डिसेंबर रोजी पालिकेच्या प्रवेश द्वारातच चुली पेटविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा.

PRESS MEDIA LIVE :

 

इचलकरंजी : येथील जय भीमनगरमधील उर्वरित 108 घरकुलांचा प्रश्‍न गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. याप्रश्‍नी पुन्हा एकदा आज लाभार्थ्यांनी पालिकेवर मोर्चा काढला. 10 डिसेंबरपर्यंत बांधकामास सुरुवात न केल्यास 11 डिसेंबर रोजी पालिकेच्या प्रवेशद्वारात चुली पेटविण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लाभार्थ्यांनी यावेळी दिला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीमनगर येथील उर्वरित 108 लभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्‍न गेली 10 वर्षे प्रलंबित राहिला आहे. याबाबत लाभार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. यापूर्वी केलेल्या आंदोलनात महिन्याभरात बांधकामाला सुरुवात करण्याचे आश्‍वासन दिले होते.मात्र, अद्याप कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याने लाभार्थ्यांनी आज पुन्हा पालिकेवर मोर्चा काढला.

नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी लाभार्थ्यांनी चर्चा केली. किती दिवस भाडे देऊन आम्ही बाहेर रहायचे, असा संतप्त सवाल त्यांनी या वेळी केला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत येथून हालणार नाही, अशी भूमिका या लाभार्थ्यांनी घेतली. प्रशासनाकडून नगर अभियंता संजय बागडे यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

घरकुल बांधणीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे, तर शिल्लक निधी वापराबाबतच्या प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a comment

0 Comments