जनावरांचा बाजार सुरू

 गडहिंग्लज येथील जनावरांचा बाजार सुरू झाला.PRESS MEDIA LIVE : 

गडहिंग्लज : कोरोनामुळे तब्बल 33 आठवड्यांनी येथील जनावरांचा आठवडा बाजार सुरू झाला. दरवर्षीच्या तुलनेत 20 टक्के आवक जनावरांच्या बाजारात झाली. सोयाबीनचा भाव वधारला आहे. गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या कांद्याचे दर तेजीतच आहेत. भाजीमंडईत पालेभाज्यांची मागणी कायम आहे. फळबाजारात नागपूर परिसरातील संत्र्याची नवी आवक सुरु झाली आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून येथील जनावरांचा बाजार बंद होता. परिणामी, बैल, म्हशी, गायी, शेळ्या-मेंढ्या यांची खरेदी-विक्री ठप्प होती. साहजिकच शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने जनावरे खरेदी करावी लागली. विशेषतः खरीप हंगामासाठी एप्रिल-मेमध्ये बैलजोड्यांची, तर ऑगस्ट महिन्यापासून दूध व्यवसायासाठी म्हशींची अधिक प्रमाणात खरेदी केली जाते.अशा शेतकऱ्यांचीही अडचण झाली. या पार्श्‍वभूमीवर गेल्या दीड महिन्यापूर्वी पणन मंडळाने योग्य ती खबरदारी घेऊन बाजार सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, बाजार समितीच्या उदासीनतेमुळे बाजार भरला नाही. आता राज्य शासनाने आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी दिल्याने जनावरांचा बाजार सुरू झाला. अजुनही आठवडा बाजारबाबत संभ्रम असल्याने आवक जेमतेम आहे.

सोयाबीनचा दर वधारला आहे. हमीभावापेक्षा दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणुकीला प्राधान्य दिले. या आठवड्यात दर वाढल्याचे व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले. सध्या 4100 रुपये क्विंटल असा दर आहे. उत्पादकांना अजुनही दर वाढण्याची अपेक्षा असल्याने आवक कमीच आहे. पालेभाज्या, फळभाज्या यांची मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पंधरवड्यापासून दर वाढलेले आहेत. फळभाज्यांचे दर किळकोळ बाजारात 80 रूपयांवर पोहचले आहेत. पालेभाज्या 10 रुपये पेंढी असा दर आहे. संत्र्याची नवी आवक सुरू झाली असुन 60 ते 80 रुपये असा किलोचा दर आहे. वाढलेला कांद्याचा दर किलोला 50 ते 80 रुपयांपर्यंत टिकून आहे.

बाजाराची संभ्रमावस्था कायम...

राज्यशासनाने 14 आक्‍टोंबरला आठवडा बाजाराला परवानगी दिली. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे हा बाजार बंद होता. स्थानिक प्रशासनाने बाजाराबाबत भूमिका जाहीर न केल्याने दोन आठवड्यानंतरही पूर्ण क्षमतेने बाजार भरलेला नाही. सीमाभागातील विक्रेत्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. केवळ लक्ष्मी रोडवरच भाजी विक्रेते असल्याने त्याचठिकाणीच बाजारासारखी गर्दी होते आहे.

Post a comment

0 Comments