रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न


 प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने मे महिना हा युवा महिना म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला युवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने रोटरी प्रांत ३१७० चे पुढील वर्षीचे प्रांतपाल नासिर बोरसादवाला, कोल्हापूर हे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना त्यांनी "सन्मानप्राप्त युवक युवतींच्याकडून आज होत असलेले कार्य आणि त्यातून मिळणारी ऊर्जा सर्वांच्यासाठीच प्रेरणादायी आहे. समाजात आज अनेकवेळा विदारक परिस्थिती आढळते, त्यासाठी युवावर्गाची निश्चितपणे मदत होऊ शकेल आणि सामाजिक दृष्टीने त्यांनी ती करावी" अशा आशयाचे उदगार काढले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या युवक, युवतींचा सन्मान करण्यात आला. कु. पूजा दानोळे (सायकलिंग - क्रीडा क्षेत्र), कु. स्नेहल माळी (सामाजिक क्षेत्र),  सौ. ऋचा सारडा - बियाणी (शैक्षणिक क्षेत्र), अनिल भुतडा (व्यावसायिक क्षेत्र) आणि विवेक सुतार (गायन - सांस्कृतिक क्षेत्र) या सर्वांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सन्मानप्राप्त सर्व युवक, युवतींनी समयोचित व प्रेरणादायी मनोगत व्यक्त करताना आपली यशस्वी वाटचाल कशाप्रकारे झाली हे सांगितले.

कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे या नात्याने उपस्थित असलेले सहाय्यक प्रांतपाल पन्नालाल डाळ्या यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून युवकांचा गौरव केला. स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत कांबळे यांनी करून दिला. हसमुख पटेल यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले. याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांची सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी श्रीकांत राठी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post