प्रसारमाध्यमे, पर्यायी माध्यमे आणि लोकशाही

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९०)

आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले.त्याला १९० वर्षें झाली. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रपणे व उघडरीतीने विचार करण्यास स्थळ व्हावे या इच्छेने मुंबईत राहणाऱ्या कितीक लोकांच्या मनात आहे की,दर्पण नावाचे एक न्युज पेपर म्हणजे वर्तमानपत्र प्रसिद्ध करावे.या देशाचे लोकांत विलायती विद्यांचा अभ्यास वाढावा आणि तेथील ज्ञान प्रसिद्ध व्हावे.तसेच विलायतेतील विद्या,कला कौशल्ये याविषयीचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील.’

तो काळ ब्रिटिश सत्तेचा अंमल प्रस्थापित होऊ लागलेला होता. १८५७ चा उठाव अजून पंचवीस वर्षे पुढे होता. त्यावेळीही आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांना आपल्या देशाची समृद्धी आणि लोकांचे कल्याण व्हावे असे वाटत होते. कालांतराने देश स्वतंत्र झाला त्यालाही आता पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण भारताची राज्यघटना बनवली. या राज्यघटनेत्वारे आपण भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प केला आहे. राज्यघटनेचा संपूर्ण सरनामा अस्तित्वात येण्यासाठी जनमानसात रुजण्यासाठी लोकशाही व्यवस्था अत्यंत सुदृढ पद्धतीने कार्यरत असण्याची गरज असते. जेव्हा माध्यमे स्वतंत्र, स्वायत्त असतात तेव्हा लोकशाहीची प्रक्रिया नेमकेपणाने साध्य होत असते. आज भारतात संसदीय लोकशाही निश्चितपणे आहे. निवडणूक प्रक्रियेपासून संसदीय अधिवेशनापर्यंत सारे व्यवस्थित सुरू आहे. पण सर्वार्थाने ही व्यवस्था टिकली पाहिजे असा वर्तन व्यवहार मात्र वरिष्ठ पातळीवरून होताना दिसत नाही.

स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली. त्यात वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते.वृत्तपत्र ही लोकविश्वासास उतरलेली आहेत.लोकशिक्षणाचे प्रभावी काम करून समाज परिवर्तनाचे साधन बनल्याची वृत्तपत्रांची क्षमता मोठी आहे. समाजासमोर सर्व प्रकारची वाढती आव्हाने आहेत.सामाजिक विषमता व दुरवस्था वाढते आहे. म्हणूनच प्रबोधनाच्या प्रवासात सर्वात समर्थ माध्यम म्हणून वृत्तपत्राचे महत्व आणि योगदान मोठे आहे. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘ ,हा आगरकरी बाणा पत्रकारितेत गृहीत धरलेला आहे. लोकांचा आजही छाप्यावर विश्वास आहे.

आज सोशल मीडिया नावाच्या माहितीच्या मोहजालाने काही प्रश्न तयार केले आहेत. लोकमानस तयार करण्यापासून ते सत्ता निवडी पर्यंतच्या साऱ्या प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते आहे.एकीकडे हे वास्तव आहे तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर हेरगिरी करण्यापर्यंत आणि सत्तेचा वापर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्यापर्यंत मोकाटपणे होतो आहे.ही चिंताजनक बाब आहे. आज व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाज माध्यमातून कोणीही, काहीही मनमानी पद्धतीने व्यक्त होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यालाच भीक म्हणणारे विकृत अभिव्यक्ती स्वातंत्र्य चलतीत आहे. काहीना आपली खरी मते मांडण्याची किंमत प्राण देत चुकवावी लागत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे. प्रत्येकाला खरे ऐवजी बरे बोलावे,लिहावे लागेल अशा दहशतीच्या वर्तमानात आपण वापरत आहोत. भावना नावाची तरल बाब आणि सद्भावना नावाची मानवी प्रवृत्ती आता अविवेकी झुंडशाहीच्या हातात गेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनादत्त आहे. आपले विचार ,संवेदना आणि भावना व्यक्त करणारे हे स्वातंत्र्य नैसर्गिक आहे.माणूस, प्राणी या बरोबरच वनस्पतीही अभिव्यक्ती जोपासतात हे विज्ञानाने सिद्ध केले.अभिव्यक्ती दडपली जात असताना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दाखवलेल्या आरशात पाहून वास्तवाचे प्रतिबिंब समजून घेण्याची गरज आहे.

राज्यघटनेच्या मूलतत्त्वात स्वीकारण्यात आलेल्या लोकशाही  संकल्पनेचा आशय आणि पल्ला प्रतिनिधिक लोकशाही कडून सहभागी लोकशाही कडे जाणारा आहे .मात्र तसे असले तरी प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात लोकशाहीची परवड सुरू आहे हे नाकारता येत नाही. माध्यमांवर अंकुश ठेवण्याची विकृती सत्ताधाऱ्यात वाढत जाणे हे नेहमीच हुकूमशाहीचे द्योतक असते. 

न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या तीन स्तंभांबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिले जाते. या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे.त्यांनी एकमेकात ढवळाढवळ करू नये असा लोकशाहीचा संकेतही आहे.पण आज अन्य सर्व संकेतांप्रमाणे हा संकेतही झुगारून दिला जात आहे .मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत नाहीत.आणि सत्ताधारी माध्यमांना सामोरे जात नाहीत. अशावेळी ही पोकळी पर्यायी समाज माध्यमे भरून काढत असतात. प्रसार माध्यमे ही जनतेचा आवाज म्हणून काम करत असतात. ते काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे ही अपेक्षाही असते. सत्याचा अनुल्लेख आणि असत्याचा गाजावाजा फार काळ टिकत नसतो. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचे सामूहिक शहाणपण नेहमीच महत्त्वाचे ठरत आले आहे हा जगभरचा इतिहास आहे.

आज जगभरच समांतर माध्यमे निर्माण होत असताना दिसत आहेत. पत्रकारितेमध्ये या पर्यायी माध्यमातून हस्तक्षेप होताना दिसत आहेत. त्यांचे महत्त्वही अधिक वाढताना दिसत आहे. पर्यायी माध्यमे निर्माण होत असल्यामुळे आता केवळ स्टुडिओत अथवा टेबलवर बसून पत्रकारिता होऊ शकत नाही.  न्यूज लॉन्ड्री , आल्टन्यूज, द वायर, पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (पारी) ,न्युज क्लिक, स्क्रोल, आर्टिकल १४ अशा काही पर्यायी माध्यमांचे महत्व नक्कीच मोठे आहे. ज्येष्ठ पत्रकार एम.एन.पार्थ यांच्या मते ,पर्यायी अवकाशात काम करणाऱ्या या माध्यमांनी जी पत्रकारिता करून दाखवली ती मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी केली नसती .आज भारतीय पत्रकारितेसाठी दिवस कठीण आहेत .पत्रकारांवर प्रचंड दबाव आहे आणि सेन्सरशिपचीही टांगती तलवार आहे. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रस्थापित सत्तेच्या विरोधात असल्याबद्दल त्रास दिला जातोय. धमक्या मिळत आहेत .आणि तुरुंगवासही भोगावा लागतोय. अशा काळात मुख्य प्रवाहातल्या काहींनी मात्र सोपी वाट चोखाळण कारण पसंत केले आहे.

खोट्या बातम्या पसरवण्यासाठी, विद्वेष पसरवण्यासाठी, गैरसमज रूढ करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर अत्यंत वेगाने सुरू आहे .पण त्याचा पर्दाफाश करण्याचे काम आज अनेक पर्यायी माध्यमिक करत आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे .अर्थात ही पर्यायी माध्यमे चालवणे तसे अवघड काम आहे .पण तरीही ते केले जाते हे महत्त्वाचे आहे. या पर्यायी माध्यमानी गेल्या काही वर्षात त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळवलेले आहेत. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे ,ही सर्वच पर्यायी माध्यमे इंग्रजी भाषेत काम करतात. त्यांचे काम ,लेखन व भूमिका  प्रादेशिक भाषेत अनुवादित करण्याची नितांत गरज आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरण्यासाठी ती आवश्यक बाब आहे. म्हणूनच पर्यायी माध्यमांच्या सक्षमीकरण बाबत एम.एन. पार्थ म्हणतात, 'सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे .फेक न्युज वणव्यासारखी पसरण्याचं ते मुख्य माध्यम आहे .पण दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामुळे आता एखादी बातमी दडपता येत नाही. पत्रकारिता म्हणजे इतिहासाचा पहिला रफ खर्डा आहे असं वॉशिंग्टन पोस्ट चे प्रकाशक आणि अध्यक्ष फिलिप एल.ग्रॅहम यांनी म्हटलं होतं. पी.साईनाथ म्हणतात की, चांगली पत्रकारिता म्हणजे समाजाचा एकमेकांशी चाललेला संवाद असतो. त्यामुळे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची ,टीका करण्याची आणि चर्चा करण्याची समाजाची क्षमता कायम राहते. आजच्या काळातल्या कलकलाट करणाऱ्या टीव्हीवरच्या चर्चांमुळे ही क्षमताच लोप पावत चालली आहे. आणि नेमकी तीच जागा पर्यायी माध्यम भरू पाहताहेत.'

ही पर्यायी माध्यमे आणि त्याचे पत्रकार मोठी जोखीम पत्करून पत्रकारिता करत आहेत. त्यांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न झाले तरी ते आपल्या आतल्या आवाजाला जाऊन आपले काम सुरूच ठेवत आहेत. ती निर्भिडता बाळगून आहेत.सरकार  चुकत असेल तर त्याला चूक आहे म्हणण्याचे धाडस दाखवत आहेत. अलीकडे खऱ्या बातम्या तयार होण्याऐवजी त्या बातम्या गायब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सरकारला अनुकूल असलेले सांगणे आणि प्रतिकूल असलेले दाबून ठेवणे हा मार्ग प्रवाहपतीत सत्ता माध्यमाने स्वीकारलेला आहे. वास्तवापासून प्रेक्षकांना श्रोत्यांना वाचकांना दूर नेले जात आहेत. विरोधी पक्ष व विरोधी विचार दाबण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे .ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार म्हणतात,' विरोधी पक्ष जनतेचा आवाज असतो. विरोधी पक्षाचा आवाज दाबून एका परीने जनतेचा आवाज दाबला जात आहे. जनतेचा आवाज याचसाठी बंद केला जात आहे, जेणेकरून फक्त आणि फक्त एकच आवाज शिल्लक राहील. परंतु आवाजाच्या विविधतेशिवाय कुठलीही लोकशाही जिवंत राहू शकत नाही.'म्हणूनच लोकशाही जिवंत राहायची असेल तर ही पर्यायी माध्यमे बळकट करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. लोकशाही आबाधित राहण्यासाठी आणि आपले  विचार,उच्चार,अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे ‘सरचिटणीस’आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच नामवंत लेखक, कवी,गझलकार आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post